गृहपयोगी वस्तूंनी सजली बाजारपेठ
अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे. आनंददायी पर्वाच्या मुहूर्तावर यंदा नाशिककरांनी फ्रीज, वॉशिंग मशिन्स, टीव्ही, एसी, मायक्रो ओव्हन, एअर फ्रायर अशा विविध होम अप्लायन्सेस खरेदीसाठी पसंती पाहायला मिळत आहे. ग्राहकांचा उत्साह लक्षात घेत शोरूम्सकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गौरव जोशी
आनंदपर्व दिवाळी सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. कंपन्या तसेच आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) वाटप केल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांचा होम अप्लायन्सेस्तंर्गत निरनिराळ्या वस्तू खरेदीकडे कल वाढला आहे. त्यामध्ये फ्रीजला सर्वाधिक मागणी आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार बाजारपेठेत निरनिराळ्या कंपन्यांचे १८५ लीटरपासून पुढे तसेच विविध रंगसंगतीमधील फ्रीज उपलब्ध आहे. त्यासोबतच ॲन्ड्राईड टीव्ही खरेदीकडेही नाशिककरांचा कल वाढला आहे. सर्वसामान्य ग्राहक साधारणत: ३२, ४०, ४२, ५५ ते ६५ इंचापर्यंतचे टीव्ही बुक करीत आहे. तसेच ६५ इंचावरील टीव्ही खरेदीलाही चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे शोरूमचे संचालक सांगत आहे.
चालु वर्षी नोव्हेंबर उजाडला तरीही थंडीची म्हणावी तशी चाहुल लागलेली नाही. त्यातच सततच्या वातावरणातील बदलामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. या उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी बाजारपेठेतील एक टनापासून पुढील उपलब्ध एसी खरेदीत वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त वॉशिंग मशिन, घरगुती वापरातील एअर फ्रायर, निरनिराळ्या प्रकारचे ज्युसर्सच्या खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. दरम्यानच्या काळात गृह सजावटीसह दैनंदिन वापरात उपयोगी पडणाऱ्या होम अप्लायन्सेस्लाही वाढती मागणी असल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे.
---
मोबाईल बाजारपेठेत धूम
नाशिककरांची सर्वाधिक पसंती मोबाईल खरेदीला मिळते आहे. दिवाळीच्या आनंदपर्वात मोबाईल घरी घेऊन जाण्यासाठी लगबग दिसून येत आहे. ग्राहकांची खरेदीची क्षमता बघता साधारणत: दहा हजारां पासून ते दोन ते अडीच लाखांपर्यंतचे मोबाईल बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे निरनिराळ्या कंपन्यांनी दिवाळीचा सणाच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स लागू केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खरेदीचा आनंद द्विगुणित झाला आहे. यंदाच्या वर्षी दिवाळीमध्ये मोबाईल बाजारपेठेत अंदाजे २५ ते ३० कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञाने वर्तविली आहे.
---
ऑफर्सचा वर्षाव
बाजारपेठेतील लगबग बघता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या शोरूम्सतर्फे ऑफर्स देण्यात येत आहे. त्यामध्ये ठराविक खरेदीवर विविध गिफ्टस्, दरांमध्ये सवलत दिल्या जात आहे. दुसरीकडे ग्राहकांची गरज ओळखून विविध बँका व फायनान्स कंपन्यांकडून त्यांच्या क्रेडीट कार्डवर सवलतीसह शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनादेखील समाधानाचे वातावरण आहे.