एन्कर
फोटो : H34662
नाशिक : पोलिस अधिकारी व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीप्रसंगी आशिष नहार, राजेंद्र पानसरे आदी.
...
दिवाळीत औद्योगिक वसाहतींना पोलिस सुरक्षा
चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : दिवाळीच्या सलग सुट्ट्यांच्या कालावधीत सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील कारखाने बंद राहतील. त्यामुळे चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि उद्योजकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल, असे आश्वासन सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांनी दिले.
‘निमा’ सभागृहात पोलिस अधिकारी व औद्योगिक संघटना प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या वेळी नाशिक इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) अध्यक्ष आशिष नहार, अंबड इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (आयमा) अध्यक्ष राजेंद्र पानसरे, निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, ‘आयमा’चे सरचिटणीस संजय महाजन, निमा ग्रीव्हन्स कमिटीचे चेअरमन कैलास पाटील, अंबड एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरोटे आणि सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे उपस्थित होते. या वेळी आशिष नहार आणि राजेंद्र पानसरे यांनी औद्योगिक मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने मांडला. दिवाळीनिमित्त ८ ते १४ नोव्हेंबर कालावधीत औद्योगिक परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविणे, विशेषतः रात्रीच्या वेळी अधिक दक्षता घेणे तसेच उद्योजकांनीही स्वतःच्या स्तरावर आवश्यक ती खबरदारी घेणे, या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. औद्योगिक वसाहतींमधील प्रत्येक कारखाना, त्यातील यंत्रसामग्री आणि मौल्यवान साहित्य सुरक्षित राहावे, यासाठी पोलिस प्रशासन आणि उद्योजकांनी परस्पर समन्वयाने काम करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
---चौकट
रात्रीची विशेष गस्त
सुट्ट्यांच्या कालावधीत पोलीस प्रशासनाकडून औद्योगिक वसाहतींमध्ये नियमित गस्तीबरोबरच रात्री विशेष गस्त वाढविण्यात येणार आहे. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. उद्योजकांनीही आपल्या सुरक्षा रक्षकांना सतर्क ठेवून कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाला थारा देऊ नये. पोलिस प्रशासन आणि उद्योजक यांच्यातील परस्पर समन्वयातूनच संभाव्य अनुचित प्रकारांना प्रभावीपणे आळा घालता येईल, असेही बारी यांनी स्पष्ट केले. बैठकीस राजेंद्र कोठावदे, अविनाश बोडके, दीपाली चांडक, दिलीप वाघ, नितीन आव्हाड, जयश्री कुलकर्णी, गोविंद बोरसे, नानासाहेब देवरे, नीलिमा पाटील, भावेश भंसाळी, मंगेश गांधी, विनोद कुंभार, रावसाहेब रकिबे आदी उपस्थित होते.