पान चार ॲंकर
-----------------
आली दिवाळी लोगो घेणे
--------------------
15120
नाशिक : दिवाळीनिमित्ताने विक्रीस आलेले लक्ष्मी पावले आणि रांगोळी स्टिकर सह इतर साहित्य.
दिवाळीत लक्ष्मी पावलांसह सजावटीच्या साहित्याला मागणी
तयार रांगोळी स्टिकर्स अन् तोरणा खरेदीसाठी बाजारात महिलांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. २९ : भारतीय संस्कृतीत लक्ष्मी पावलांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक शुभकार्यात लक्ष्मी पावलांचे पूजन केले जाते. त्यामुळे पुरातन काळापासून दिवाळीत यास विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्ताने दिवाळीच्या शुभ पर्वासाठी बाजारात विविध प्रकारचे लक्ष्मी पावले आणि तोरण विक्रीस उपलब्ध झाले आहे. नागरिकांकडून त्यांच्या खरेदीकडे कल वाढला असल्याचे दिसून आले.
दिवाळीच्या मंगल पर्वावर घराच्या उंबरठ्यावर आणि अंगणात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस पूर्वी रांगोळीच्या माध्यमातून लक्ष्मी पावले साकारली जात असत. मात्र, काळाप्रमाणे या परंपरेलाही आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे. वेळेच्या अभावामुळे बाजारात आता कागदी, ॲक्रेलिक आणि लाकडी स्वरूपात लहान-मोठे लक्ष्मी पावले विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे ''शुभ-लाभ'' लिहिलेली नावे विविध डिझाईन्समध्ये, तसेच उंबरपट्टी, तोरण, वॉलपीस आणि झुंबर यांसारख्या विविध वस्तूही मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल झाल्या आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू असून, जागोजागी दुकाने सजली आहेत. दरम्यान, महागाई आणि कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे यंदा या साहित्याच्या दरांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
---
रांगोळी स्टिकर्सचे वाढते आकर्षण
धावपळीच्या जीवनात पूर्वीप्रमाणे घराच्या अंगणात प्रत्यक्ष रांगोळी काढणे अनेक महिलांना शक्य होत नाही. शिवाय, सध्या बहुतांश ठिकाणी फ्लॅट सिस्टीमची पद्धत असल्याने घरांसमोर अंगण किंवा फ्लॅटसमोर रांगोळी काढण्यासाठी हवी तशी जागा राहत नाही. यावर मात करण्यासाठी नागरिकांकडून रेडिमेड आणि विविध आकर्षक डिझाईन्समध्ये असलेले रांगोळी स्टिकर्स खरेदी करून फ्लॅट, घरे व दुकानांसमोर चिकटविण्यावर भर दिला जात आहे.
------
''शुभ-लाभ''चे विविध प्रकार
हत्ती, गाय-वासरू, कलश, मोर आणि स्वस्तिक यांसारख्या पारंपरिक व शुभ प्रतीकांच्या विविध डिझाईन्समध्ये ॲक्रेलिक, कागदी आणि लाकडी स्वरूपातील ''शुभ-लाभ''चे प्रकार बाजारात उपलब्ध असून, ते ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
...............
असे आहेत दर
लक्ष्मी पावले......................२० ते १००
शुभ लाभ........................५० ते ३००
उंबर पट्टी.........................२०
रांगोळी स्टिकर......................२० ते १५०
शुभ लाभ तोरण......................८० ते १००
तोरण विविध प्रकारचे...................१५० ते ३००
झुंबर..............................१०० ते ३००