भेटवस्तू म्हणून दिवाळी अंक, पुस्तकांना मागणी
खरेदीसाठी वाचकांची लगबग ; महिनाभर खरेदी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : दिवाळीच्या हंगामात सुट्ट्यांमुळे निवांतपणा असल्याने सध्या बाजारपेठेत दिवाळी अंकासह, पुस्तक खरेदीला वेग आला आहे. महाराष्ट्राला दिवाळी अंकाची मोठी परंपरा लाभल्याने २५ टक्के अंकाची दिवाळीपूर्वी आगाऊ बुकिंग झाली होती. तसेच दिवाळीपासून ते संपूर्ण महिनाभर दिवाळी अंकांसह पुस्तकांना मागणी असल्याचे पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले.
दिवाळी अंक वाचणारा विशिष्ट वाचकवर्ग आहे. अंकात मुलाखती, रिपोर्ताज, वैचारिक लेख, हलक्याफुलक्या विनोदी कथा, कविता, बालकथा, शब्दकोडे, रहस्यमय गूढकथा, विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या अनेक घटकांवर दिवाळी अंक विशेषांक बाजारात येत असल्याने वाचकांसाठी वाचण्याची पर्वणी असते. पुस्तकांच्या दुकानात दिवाळी अंकाबरोबर पुस्तकेदेखील हाताळले जात असल्याने या काळात पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. सध्या बाजारात प्रमुख प्रकाशकांचे ४० ते ४५ नवीन पुस्तके बाजारात आली असल्याने अंकाबरोबर पुस्तकांचीदेखील विक्री होत आहे. खास बालवाचकांसाठी बाजारात येणाऱ्या दिवाळी अंकाना विशेष पसंती असल्याने त्याची बालवाचकांना अभ्यास क्रमातील पुस्तकांव्यतिरिक्त वाचनीय अंक वाचायला मिळतात. कागद महागल्याने अंकाची किंमत यंदा दहा टक्क्यांनी वाढली असली तरी, अंकाना चांगली मागणी व प्रतिसाद मिळत आहे.
--चौकट
बुके नको...
दिवाळीत आप्तेष्ट, नातेवाईकांना भेटवस्तू देण्यासाठी सध्या पुस्तक, दिवाळी अंक मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जात असल्याचे पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले. बुके ठराविक काळाकरिता असतात परंतू, पुस्तक, दिवाळी अंकाचा सेट भेटवस्तू म्हणून दिल्यास ती एक आठवण राहते. त्यामुळे बुके देण्यापेक्षा अंकाचा सेट भेट देण्याचा सध्या ट्रेन्ड आहे.
---चौकट
स्थानिक दिवाळी अंकाची परंपरा
शहरात सार्वजनिक वाचनालयासह सुभाष सबनीस, पुंजाजी मालुंजकर, विजयकुमार मिठे, ब्रिजकुमार परिहार, गिरणा गौरव प्रतिष्ठान सारख्या संस्था वाचन चळवळ रुजविण्यासाठी स्थानिक दिवाळी अंक प्रकाशित करीत असतात. यामध्ये नागपूर, वर्धा, सातारा, कोल्हापूर, सांगली शहरातून लेखक मंडळी लेखन करीत असतात.
-------------