धुळे : टुडे पान २ साठी...
---
राजवाडे ग्रंथालयात दिवाळी अंकाची पर्वणी
धुळ्यात १२१ विविध दिवाळी अंकांच्या उपक्रमाचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ : मोबाईल आणि ऑनलाइन माध्यमांच्या काळात वाचन संस्कृती मागे पडत चालली आहे. हा मोह टाळून वाचन छंद जोपासण्यासाठी धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळ ग्रंथालयातर्फे वाचकांसाठी यंदा १२१ प्रकारच्या विविध दिवाळी अंकांची पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विशेष दिवाळी अंक योजनेचा प्रारंभ धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर झाला. वाचकांना माफक दरात वर्षभर विविध विषयांचे दिवाळी अंक उपलब्ध करून देणारी ही संधी असून, सर्व वाचकप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी केले.
प्रारंभी ग्रंथालयाची व दिवाळी अंकाची माहिती देताना संचालिका जयश्री शहा यांनी वाचकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या संग्रहात विनोदी, ललित, रहस्य कथा, ज्योतिष विज्ञान, आरोग्य, तसेच महिला आणि बालकांसाठी विशेष दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या प्रारंभप्रसंगी मंडळाचे व्यवस्थापक विकास कपोले, सहायक ग्रंथपाल रेणुका शिंदे, वैशाली कुलकर्णी, राजश्री भडागे, सोनाली वाघ, भुषण बर्गे, प्रकाश कुलकर्णी, परेश चंद्रात्रे, दुर्गेश जोशी, गुलाब भील, दर्शन माळी, नाना सोनवणे, शरद पंडित आदी उपस्थित होते.