B61164
-----------
उत्पन्न बुडाल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी
ऐन दिवाळीत मुख्य बाजारपेठेतील दुकाने ठेवली बंद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे स्थानिक बाजारपेठ सक्तीने बंद ठेवली गेली. ऐन दिवाळीच्या तोंडावर रविवार कारंजा, मेन रोड, दहीपूलाची दुकाने यंत्रणेकडून बंद ठेवली गेल्याने उत्पन्नावर पाणी फेरले गेल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.
ध्वजारोहण कार्यक्रमासाठी रामतीर्थाकडे येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी बॅरेकेटिंग केले होते. यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोडचा काही भाग, रविवार कारंजा, रविवार पेठ, सराफ बाजार, भांडी बाजार, धुमाळ पॉइंट येथील बहुतांश दुकाने बंद होती. अनेक ठिकाणी दुकानदारांना पोलिसांनी आतच न सोडल्याने ते दुकानांपर्यंत पोचू शकले नाही. पुढील आठवड्यापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत असून, शनिवारी-रविवारी कामगार वर्गाची खरेदीसाठी गर्दी होईल, असा व्यावसायिकांचा अंदाज होता. परंतु दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्याने मोठे उत्पन्न बुडाल्याची खंत व्यावसायिकांनी मांडली. सायंकाळनंतर बाजारपेठेतील काही दुकाने खुली झाली होती. परंतु वाहतुकीच्या निर्बंधांमुळे ग्राहक बाजारपेठेपर्यंत पोचू शकले नव्हते.
-----चौट
आता हीच स्थिती कायम ठेवा..
एरवी शहरातील रस्त्यांवरून जातांना अतिक्रमीत हातगाड्या, अनधिकृतरीत्या रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा सामना शहरवासीयांना करावा लागतो. मान्यवरांच्या दौऱ्यानिमित्त रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढले. तसेच अनधिकृत वाहनतळांना चाप बसविण्यात आला. हीच स्थिती यापुढेही कायम ठेवत, नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा यानिमित्त व्यक्त करण्यात आली.