स्टॅण्ड अलोन फोटो जवळ घेणे
------------
चाकरमान्यांनी धरली मुंबई-पुण्याची वाट
दिवाळी उत्साहात साजरी; बसेस, रेल्वेगाड्यांना गर्दी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : दिवाळीचा सण उत्साहात साजरा केल्यानंतर चाकरमान्यांनी गुरुवारी (ता.१२) मुंबई-पुण्याकडची वाट धरली. त्यामुळे शहर-परिसरातील बसस्थानके तसेच नाशिक रोड रेल्वेस्थानकाचा परिसर गर्दीने फुलून गेली.
अंधाराकडूत तेजोमयतेकडे नेणाऱ्या दिवाळीचा सण नाशिककरांनी उत्साहात साजरा केला. यंदाच्या वर्षी लागून सुट्या आल्याने नोकरी-व्यवसायानिमित्ताने नाशिकमधून बाहेरगावी गेलेल्या नागरिकांनी कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी केली. बुधवारी (ता.११) भाऊबीजेने दिवाळीची सांगता झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्तव्यावर परतण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. नाशिक रोड रेल्वेस्थानक येथून पंचवटी तसेच राज्यराणी एक्सप्रेसह विविध रेल्वेगाड्यांनी चाकरमानी मुंबईकडे रवाना झाले. तसेच बहुतांक्ष नोकदारांनी कसारामार्गे लोकलने प्रवासाला पसंती दिली.
मुंबईप्रमाणे पुण्याकडे रवाना होणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय होती. परिणामी पहाटेपासून ठक्कर बाजार आणि मेळा बसस्थानक गर्दीने फुलून गेले. एकूणच स्थानकावरील गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने पुणे मार्गावर जादाच्या बसगाड्या सोडल्या. पण, प्रवाशांची संख्या अधिक असल्याने बस गाड्यांमध्ये जागा धरण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली. या व्यतिरिक्त सुरत, अहमदाबादसह अन्य काही शहरांत नोकरी-व्यवसायानिमित्ताने स्थानिक झालेल्या नागरिकांनीही परतीचा वाट धरली. तर दुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवाळी सणासाठी गेलेले नागरिक आता शहराकडे परतायला लागली आहे. परिणामी बसस्थानकांवर प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते आहे.
---
ट्रॅव्हल्स्, शेअरिंग कॅबचा पर्याय
दिवाळीनंतर मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने रेल्वे व बसस्थानकांवर गर्दी होत आहे. ही गर्दी बघता प्रवाशांनी खासगी ट्रॅव्हल्स्ने प्रवास करण्यास पसंती दिली. प्रवाशांची गरज लक्षात घेत ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही जादा बसेसचे नियोजन केले. याव्यतिरिक्त काहीजणांनी शेअरिंग कॅबने प्रवासाचा पर्याय निवडला.