इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल
---
दिवाळीत मोबाईलचा सर्वाधिक खप; फ्रीज, ‘एसी’ला पसंती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : अंधाराकडून तेजोमयतेकडे नेणाऱ्या दिवाळी सणात यंदा नाशिककरांनी इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंची मनमुराद खरेदी केली. या निमित्ताने मोबाईल खरेदीला सर्वाधिक पसंती मिळाली असून, फ्रीज, टीव्ही व ‘एसी’च्या खरेदीकडेही कल पाहायला मिळाला. एकूणच, दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात साधारणत: ७० ते ७५ कोटींची उलाढाल झाल्याने या क्षेत्राला ‘बूस्ट’ मिळाला आहे.
दिवाळी सण उत्साहात साजरा केल्यावर नाशिककर पुन्हा एकदा नवी आशा तसेच नव्या उमेदीसह कर्तव्यावर रुजू होत आहेत. यंदा सलग सुट्या लागून आल्याने नागरिकांनी सहकुटुंब दिवाळी सणाचा आनंद लुटला. त्याबरोबर पगार आणि दिवाळीचा बोनस हाती मिळाल्याने शहरवासीयांनी खरेदीलाही प्राधान्य दिले. बाजारपेठेत यंदा विविध कंपन्यांच्या मोबाईल खरेदीला सर्वाधिक पसंती मिळाली. सुमारे १० हजारांपासून ते दोन ते अडीच लाखांच्या मोबाईल्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या क्षेत्रात ३० ते ३५ कोटींची उलाढाल झाल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
शहरवासीयांनी दिवाळीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस घरी नेले. विशेषत: ३२ इंचापासून पुढील ॲन्ड्राइड टीव्हीला सर्वाधिक मागणी होती. त्या खालोखाल वॉशिंग मशिन्स, ‘एसी’, कूलरच्या खरेदीकडेही कल पाहायला मिळाला. दरम्यान, या वेळी बहुतांश कंपन्यांनी इलेक्ट्रीक कॅटल, एअर फायरबरोबरच निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भेट स्वरूपात कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यामुळे एकूणच या क्षेत्राला आर्थिक हातभार लागला असून, साधारणत: ४० कोटींच्या आसपास उलाढाल झाल्याचे समजते आहे.
दिवाळीमुळे ‘बूस्ट’
जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीकडे किती प्रमाणात वळतील, अशी एक शंका बाजारपेठेत होती. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध शोरूम्सकडून इलेक्ट्रॉनिक्स अप्लायनेन्सच्या खरेदीवर ऑफर, तसेच भेटवस्तू ठेवल्या होत्या. पण, ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद पाहता या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मरगळ दूर होत खऱ्या अर्थाने या क्षेत्राला ‘बूस्ट’ मिळाला आहे.