मेन
फोटो : H34793, H34792
नाशिक : दिवाळीनिमित्त बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात करण्यात आलेले चोपडी पूजन. दुसऱ्या छायाचित्रात मंदिरावर केलेली रोषणाई व दिव्याच्या प्रकाशात उजळून निघालेला परिसर. (छायाचित्रे : केशव मते)
--
लक्षदीप हे उजळले घरी...
लक्ष्मीमातेची आराधना; अभ्यंगस्नान, चोपडी पूजन अन् फटाक्यांची आतषबाजी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : ‘लक्षदीप हे उजळले घरी... दारी शोभली खणा रांगोळी, फुलवाती अंगणात सोनसकाळी... आली दिवाळी’ दीपावलीचे वर्णन करणारा हा सप्तसूरांचा गोडवा रविवारी (ता. ८) प्रत्येक घरात जाणवत होता. निमित्त होते, लक्ष्मीपूजनाचे. सणांचा राजा दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा हे परंपरेने ठरलेले. प्रत्येक घरात चैतन्याचे दीप उजळवत सप्तरंगात न्हाऊन दिवाळी आली आणि वर्षभरासाठी तजेला देत मनामनातील उत्साह द्विगुणित करून गेली.
पणत्या, फटाके, मिठाईचा गोडवा आणि फराळाचा सुगंध या माहोलमध्ये घराघरात मुहूर्त साधून लक्ष्मीमातेचे पूजन करण्यात आले. नववर्षासाठी हिशोबाच्या चोपड्या, पेन, नवीन डायरी, रजिस्टर तसेच संगणकासह, पेनड्राइव्ह, अँड्राइड मोबाइल आणि सोने, चांदी, नोटा, सुटे पैसे यांचेही पूजन करण्यात आले. पहाटे अभ्यंगस्नानाचा मुहूर्त असल्याने भल्या पहाटे स्नानादी कर्मे उरकण्यात आली. घरोघरी उटण्याचा गंध आणि अत्तरांचा घमघमाट दरवळला. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळीच संबोधण्यात येत असल्याने अभ्यंग व दिव्यांची परंपरा आहे. या विधीला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने घरातील मोठ्या माणसांनी लहान्यांकडून आवर्जुन हे कर्म करून घेतले. अभ्यंगस्नान झाल्यानंतर घरातील महिलांनी पुरुषांचे औक्षण केले.
---चौकट
आतषबाजीचा लखलखाट
सायंकाळी घराबाहेर, दारात आणि देवघरात तेलाचे दिवे लावले. यमराज आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करून दक्षिण किंवा पूर्व दिशेला दिव्यांचे दानही करण्यात आले. चतुर्दशी व अमावास्या एकाच दिवशी आल्याने लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त रात्री साधला. सायंकाळी सहापासून रात्री साडेआठपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याने या वेळेत सर्व घरांमध्ये देवासमोर पूजेची आरास मांडून लक्ष्मी मातेची आराधना करण्यात आली. तसेच देवी मातेची आरती करून फराळाचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर नवनवीन कपड्यांमध्ये फोटोसेशनची एकच धूम उठली. सेल्फी, रिल्स काढण्यासाठी बच्चेकंपनी आणि तरुणाईने फटाक्यांची आतषबाजी केली. फटाक्यांमध्ये बरेचसे वेगवेगळे प्रकार आले असून नेत्रदीपक अशा रोषणाईने आख्खे शहर उजळून गेले.
---चौकट
मंदिरांवर आकर्षक रोषणाई
शहरातील मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, संपूर्ण गोदाघाट, महत्त्वाची सर्व मंदिरे, कालिका माता मंदिर, सोमेश्वर मंदिर यावरील रोषणाईने भक्तगणांच्या हर्षाला पारावार राहिला नाही. आनंदाने सर्व देवतांचे पूजन करण्यात आले तसेच फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी अनेकांनी शहरातून फेरफटका मारला. १० रोजी बलिप्रतिपदा आणि ११ रोजी भाऊबीज असल्याने चैतन्याचा हा माहोल बुधवारपर्यंत राहणार आहे.