NSK26H34758--NSK26H34760
नाशिक : दिवाळीच्या दिवशीही वाहतूक नियमनासाठी कर्तव्यावर असलेले पोलिस वॉर्डन. दुसऱ्या छायाचित्रात जिल्हा रुग्णालयात उपस्थित असलेल्या परिचारिका.
-------------------------------
दिवाळीतही खाकी, पांढऱ्या कोटचा पहारा
नागरिकांसाठी २४ तास सेवा देणाऱ्या यंत्रणा दिवाळीतही कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : आनंद, रोषणाई आणि उल्हासाचा सण असलेल्या दिवाळीच्या दिवसात सर्वसामान्य नागरिक कुटुंबीयांसोबत फराळाचा आस्वाद घेत असताना, शहराच्या सुरक्षेची आणि आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या यंत्रणा मात्र अहोरात्र सज्ज आहेत. ''सेवा हीच ईश्वरसेवा मानत डॉक्टर, परिचारिका, पोलिस आणि वाहतूक कर्मचारी आपल्या घरी सण साजरा करण्याऐवजी कर्तव्याला प्राधान्य देत आहेत.
जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन सेवा २४ तास अविरत सुरू असून, सणाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या सेवेसाठी विशेष वैद्यकीय पथक आणि परिचारिका कर्तव्यावर तैनात आहेत. आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास उपचारात खंड पडू नये, यासाठी रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) केवळ दिवाळी पाडवा आणि भाऊबिजेच्या दिवशी बंद राहील. इतर वेळी तो पूर्ववत सुरू राहून रुग्णांना दिलासा मिळणार आहे. सणाच्या आनंदातही रुग्णांची प्रकृती बरी व्हावी, यासाठी झटणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातच एकमेकांना फराळ देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी यासंदर्भात बैठक घेत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व संबंधित विभागांना सूचना केल्या आहेत. रुग्णसेवा ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असल्याने रुग्णालयाच्या बाह्य कक्ष विभागाला सलग सुट्टी येणार नाही याची दक्षता घेण्यात आली. रुग्णांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रुग्णालयाची अत्यावश्यक सेवा मात्र २४ तास नियमितपणे सुरू राहणार आहे. रुग्णालयात दिवसांसाठी किमान दीड हजार रुग्णांची रोज तपासणी होते तर रुग्णही मोठ्याप्रमाणात दाखल होत असतात. त्यामुळे ग्रामीण, आदिवासी भागातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळावी आणि त्यांना रुग्णसेवा मिळावी यादृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या बाजूला, शहरभर खरेदीसाठी होणारी गर्दी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस आणि ट्रॅफिक वॉर्डन रस्त्यांवर अहोरात्र उभे आहेत. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात अधिकारी आणि अंमलदार सतर्क भूमिकेत आहेत.
कुटुंबापासून दूर राहून सणाच्या दिवशीही कर्तव्य बजावणाऱ्या या खाकी आणि पांढऱ्या कोटमधील योद्ध्यांमुळेच सर्वसामान्य नागरिक निर्धास्तपणे आणि सुरक्षित वातावरणात आपला सण साजरा करत आहेत. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेमुळे यंदाची दिवाळी अधिक अर्थपूर्ण ठरत आहे.
------------------