धुळे ः टुडे १ साठी, मेन
--
फोटो क्रमांक ः 34790
धुळे : दिवाळीच्या खरेदीसाठी जुना आग्रा रोडवरील मुख्य बाजारपेठेत रविवारी झालेली गर्दी.
--
दिवाळीमुळे धुळ्यात १२५ कोटींची उलाढाल!
-
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सर्वाधिक वाहन, सोने, कपड्यांची खरेदी; व्यापारी सुखावले
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : दिवाळीचा सण आणि त्यात लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त साधत धुळेकरांनी शनिवारी (ता. ७) आणि रविवारी (ता. ८) खरेदीसाठी बाजारपेठेत अभूतपूर्व गर्दी केली. सर्वाधिक दुचाकी व चारचाकी वाहने, सोने-चांदी, कपड्यांसह इलेक्ट्रॉनिक्स, दिवाळी फराळ, मिठाई, पूजेचे साहित्य आणि अन्य खरेदीतून बाजारपेठेत सुमारे १२५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. वाहन बाजारात एकाच दिवसात १ हजार ४० दुचाकी आणि ६०० चारचाकी वाहनांची नोंदणी झाली. दिवाळीच्या मुहूर्तावर धुळ्यात आर्थिक समृध्दीचा पाऊस दिसला, असे धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी सांगितले.
-
धुळे शहरातील जुना आग्रा रोड, साक्री रोड, दत्तमंदिर चौक, पारोळा रोड, जेल रोड आणि फुलवाला चौक या प्रमुख मुख्य रस्ते व बाजारपेठांमध्ये शनिवारी आणि विशेषतः रविवारी सकाळपासूनच ग्राहकांची प्रचंड रेलचेल पाहायला मिळाली. शासकीय, खासगी आणि सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळालेला बोनस आणि सणासुदीच्या काळात विविध सरकारी योजनांच्या लाभामुळे खरेदीचा उत्साह वाढला.
-
दुष्काळाचे सावट
शहर परिसरात खरेदीचा धडाका सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागात दिवाळीचा उत्साह तुलनेने मंदावलेला दिसला. राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आगाऊ मदत म्हणून जमा झालेल्या पाच हजार रुपयांच्या अत्यंत तोकड्या रकमेतच सण साजरा करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. या पैशांतून सणाचा खर्च कसा भागवायचा आणि पुढील हंगामापर्यंत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा हताश प्रश्न शेतकऱ्यांसमोर कायम आहे.
-
सर्वाधिक उलाढाल
सर्वाधिक वाहन, सोने- चांदीच्या बाजारपेठेत ९० ते १०० कोटींची उलाढाल झाली आहे. उर्वरित कपडे आणि अन्य साहित्याच्या बाजारपेठेत २५ कोटी रूपयांची उलाढाल झाल्याचा अनुमान श्री. बंग यांनी व्यक्त केला. सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे सराफ बाजारात ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मागील वर्षी प्रति दहा ग्रॅम एक लाख ८० हजार रुपयांवर असलेले सोन्याचे दर यंदा एक लाख ३१ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. चांदीचा दर सुमारे एक लाख ८८ हजार रुपये असल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला. सोन्यात कर्णफुले, अंगठी, साखळी (चेन) आणि ब्रेसलेट यांसारख्या कमी वजनाच्या दैनंदिन वापराच्या दागिन्यांना अधिक मागणी होती. चांदीमध्ये लक्ष्मीची मूर्ती, नाणी आणि पूजेच्या पारंपरिक साहित्याला मोठी पसंती मिळाली. लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर सराफ बाजाराला चांगला प्रतिसाद लाभल्याचे अजय नाशिककर यांनी सांगितले.
-
ग्राहकांची पसंती
वाहनांच्या बाजारात ग्राहकांनी खरेदीचा मुहूर्त साधला. यात १,०४० दुचाकी व ६०० चारचाकींचे बुकिंग झाले असून, सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा ओढा वाढल्याचे चित्र आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत कंपनीकडून पुरवठा कमी पडल्याने सुमारे २०० हून अधिक ग्राहक प्रतीक्षेत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, स्मार्ट मोबाईल, लॅपटॉप आणि एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित अत्याधुनिक उपकरणांना सर्वाधिक पसंती मिळाली. सुलभ हप्ते, शून्य टक्के व्याजदर आणि कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्समुळे विक्रीला उधाण आले. शून्य व्याजदर, सुलभ हप्ते आणि आकर्षक सवलतींमुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढला.
-
पूजेचे साहित्य, फराळ
लक्ष्मीपूजनासाठी झेंडूची फुले ४० ते ५० रूपये किलो, कमळ १० ते २० रूपये नग आणि केरसुणीची ५० ते १२० रूपयांपर्यंत खरेदी झाली. चकली, शंकरपाळे, मोहनथाळ, म्हैसूर पाक यांसारख्या फराळाच्या पदार्थांची २६० ते ५५० प्रति किलो दराने विक्री झाली. कपडे बाजारात साड्या आणि मुलांच्या नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. याशिवाय अनेक नागरिकांनी नवीन घर, फ्लॅट आणि रो-हाऊसचे बुकिंग करून अथवा गृहप्रवेश करून लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला. विविध क्षेत्रांतील या भरघोस खरेदीमुळे धुळे शहरातील अर्थचक्राला मोठी गती मिळाली असून व्यावसायिक वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
-