मेन
लोगो : तयारी दिवाळीची
--
फोटो : H34389, H34390, H34391, H34387
बाजारपेठेत लखलखाट; विक्रमी उलाढालीने मरगळ झटकणार
सोने, ई-वाहने अन् कपडे खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद; गर्दीचा ओघ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : वर्षातील सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण असलेल्या ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिकची बाजारपेठ कमालीची गजबजली असून, खरेदीच्या महाप्रवाहाने व्यापारातील मरगळ पूर्णपणे झटकली आहे. कपडे, पूजा साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंपासून ते घसरलेल्या दरांमुळे सोन्याची खरेदी अन् ई-वाहनांच्या बुकिंगपर्यंत सर्वच क्षेत्रांत ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. येत्या आठ-दहा दिवसांत शहरात हजारो कोटींची विक्रमी उलाढाल होण्याचा अंदाज असून, नाशिककरांच्या खरेदीच्या उत्साहाने संपूर्ण बाजारपेठेत आनंदाचे चैतन्य पसरले आहे.
दिवाळीनिमित्त नवीन कपडे, नवनवीन वस्तू खरेदीची परंपरा जोपासताना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जातो आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेन रोड, शिवाजी रोड, शालिमार, दहीपूल या भागांमध्ये रेडिमेड कपडे खरेदीसाठी गर्दी होते आहे. तर रविवार कारंजा, अशोकस्तंभ आदी भागांमधून पूजा साहित्य खरेदीची लगबग सध्या दिसते आहे. रांगोळी, विविध साचे, तसेच घराचे तोरण, विद्युत रोषणाईची साधने या सजावटीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते आहे. सध्या दिवाळी सण साजरा करण्याच्या अनुषंगाने खरेदीचा ओघ आहे. तर प्रत्यक्षात दिवाळी सुरु झाल्यावर मुहूर्त साधत खरेदीचा योग साधला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात घसरण झाली आहे. ऐन सणासुदीला सोने स्वस्त झाल्याने ग्राहकांना खरेदीची संधी उपलब्ध झाल्याचे मत सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. यंदा धनतेरस, लक्ष्मीपूजनापासून पाडव्यापर्यंत सराफी पेढ्यांमध्ये गर्दी होण्याचा अंदाज आहे.
---चौकट
‘इव्ही’च्या मागणीत वाढ
ऑटोमोबाईल क्षेत्रासाठीदेखील दिवाळी गोड होताना दिसते आहे. दुचाकी, चारचाकीच्या आगाऊ बुकिंग झाल्या असून, मुहूर्तावर वाहन घरी नेण्याचे चोख नियोजन आखले आहे. ईव्ही वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत असल्याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदविले आहे.
---चौकट
सुकामेवा खातोय भाव
आप्तस्वकीय, मित्र परिवाराला तसेच परिचितांना, कॉर्पोरेट संबंध असलेल्या मान्यवरांना भेट देण्यासाठी आकर्षक मिठाईचे अनेक पर्याय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. अनेक नामांकित दालनांमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसते आहे. याशिवाय सुकामेवादेखील सध्या भाव खात असून, या पदार्थांच्या मागणीला पुढील आठवडाभर मागणी कायम राहण्याचा अंदाज आहे. उत्सवाचा अंदाज घेता, व्यावसायिकांनी जादाचा माल भरला आहे.
---