Diwali Shopping : नवीन वाहने खरेदीसाठी वेटिंग; यंदा 25 ते 30 टक्के वाहन खरेदी वाढली | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two wheelers on sale in showrooms on the occasion of Diwali

Diwali Shopping : नवीन वाहने खरेदीसाठी वेटिंग; यंदा 25 ते 30 टक्के वाहन खरेदी वाढली

जुने नाशिक : दिवाळीचे औचित्य साधून नागरिकांकडून नवीन वाहने खरेदी केली जातात. यंदाची दिवाळी अतिशय उत्साहवर्धक आहे. यानिमित्त नागरिकांकडून नवीन वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची वाहने ‘वेटिंग’वर असल्याची माहिती शोरूम विक्री व्यवस्थापकांकडून देण्यात आली. (Diwali Shopping Waiting to buy new vehicles This year 25 to 30 percent vehicle purchase increased Nashik Latest Marathi News)

दिवाळीत अनेक नागरिकांचा विविध वस्तू खरेदीकडे कल असतो. त्यात नवीन घर आणि नवीन वाहन खरेदीस अधिक प्राधान्य असते. विशेष करून दुचाकी, चारचाकी वाहनांचा बाजार तेजीत असतो. गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे अतिशय साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. त्यामुळे कुठल्या खरेदीचा प्रश्नच उद्भवला नाही. यंदा मात्र निर्बंधमुक्त उत्साहाने परिपूर्ण दिवाळी साजरी होत आहे. नागरिक दोन वर्षातील खरेदीचा आनंद भरून काढत आहे. त्यानिमित्त अनेक नागरिकांचा वाहन खरेदीकडे कल आहे.

इतर वर्षांपेक्षा या वर्षी सुमारे २५ ते ३० टक्के वाहन खरेदी वाढली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीचे प्रमाण अधिक आहे. इतकेच नव्हे, तर व्यावसायिक वाहन विक्रीचेही प्रमाण वाढले आहे. याशिवाय व्याजदरदेखील नागरिकांना परवडेल असा असल्याने वाहन खरेदीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या वाहने वेटिंगवर (प्रतीक्षेत) आहे. वाहनांची प्रतीक्षा यादी लक्षात घेता, यंदा दिवाळीत ५०० ते ६०० कोटीची उलाढाल होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: Dada Bhuse : अवकाळीच्या नुकसानीचे जागेवर पंचनामे : पालकमंत्री दादा भुसे

शेतकऱ्यांकडूनदेखील वाहन खरेदीस प्रतिसाद मिळत आहे. शेतमालाची वाहतूक करण्यासाठी त्यांच्याकडून व्यावसायिक वाहनांची खरेदी केली जात आहे. परतीच्या पावसाचे नुकसान सोडल्यास त्यापूर्वी चांगल्या पावसामुळे झालेली शेती त्यातून शेतकऱ्यांना मिळालेले चांगले उत्पन्न आहे. यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांचीही दिवाळी चांगली आहे. एकूणच यंदाच्या दिवाळीत वाहनांचे बाजार भरभराटीचे असल्याचे सांगितले जात आहे.

"चांगले व्याजदर, दिवाळीचा नागरिकांमधील उत्साह नवनवीन वाहनांच्या आकर्षण. यामुळे यंदाच्या दिवाळीतील वाहन बाजार तेजीचे आहे. बहुतांशी वाहनांना वेटिंग आहे. संपूर्ण शहरातील विविध प्रकारच्या वाहनांची वेटिंग लक्षात घेता. वाहन बाजारात कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे." - शिवाजी पांडे, विक्री व्यवस्थापक

हेही वाचा: Nashik : स्थानिक दुकानातून खरेदी करण्याची व्यावसायिकांची ग्राहकांना भावनिक साद