पान-१ अँकर
फोटो- 16246
मालेगाव कॅम्प : येथील नवीन बस स्थानकात झालेली प्रवाशांची गर्दी.
-----
दीपोत्सवात एसटीला एक कोटी ३४ लाखांचे उत्पन्न
७ ते १६ नोव्हेंबरदरम्यान साडेतीनशेपेक्षा अधिक फेऱ्या; गर्दी कायम
विनोद चंदन : सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प, ता. १६ : दिवाळीत येथील आगाराच्या नव्या-जुन्या अशा दोन्ही बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली. दीपोत्सवात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला तब्बल एक कोटी ३४ लाख ८८ हजारांचे उत्पन्न मिळाले. ७ ते १६ नोव्हेंबरदरम्यान प्रवाशांची संख्या वाढल्याने साडेतीनशेपेक्षा अधिक फेऱ्या झाल्या. दरम्यान, दिवाळीनंतरही येथील आगारात प्रवाशांची गर्दी होत आहे.
.....
दिवाळी व सुट्यांमुळे येथील आगाराने विशेष नियोजन केले होते. दहा दिवसांत दोन लाख ७५ हजार ३३ किलोमीटर बसचा प्रवास झाला. एक लाख ४६ हजार ६२४ प्रवाशांनी प्रवास केला. यात ६९ हजार ३७० महिला प्रवाशांचा समावेश आहे. आगाऊ बसच्या आरक्षण सुविधेचा शेकडो प्रवाशांनी लाभ घेतला. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मालेगाव आगाराने ३५० ते ४०० जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले. प्रवाशांच्या गर्दीनुसार त्या-त्या मार्गावर फेऱ्या वाढविण्यात आल्या. पुणे, नाशिक, पाचोरा, जळगाव, धुळे, चाळीसगाव आदी मार्गांवर अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्या. येथील आगारात एकूण ७५ बस असून, चाळीसगाव, पाचोरा, जळगावसाठी मालेगाव आगारातून चार बस नियमित सुरू करण्यात आल्या आहेत.
दिवाळीत नागरिकांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांची एसटीलाच पसंती मिळाली आहे. दिवाळीच्या गर्दीतही एसटीने केलेले अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन प्रवाशांसाठी दिलासा देणारे ठरत आहे. प्रवाशांचा असाच प्रतिसाद राहिल्यास मालेगाव आगाराच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकेल. नाशिकचे नियंत्रण विभागप्रमुख भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव आगारप्रमुख विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेत दीपोत्सवात सेवा पुरवली.
-----
कोट
दिवाळीत येथील आगाराला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. बस फेऱ्यांचे नियोजन केल्याने आगाराला आर्थिक फायदा झाला. महिला प्रवाशांनी सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड काढून घ्यावे. एसटी व ई-बसचा प्रवास आरामदायी व सुखदायी असल्याने त्याचा लाभ घ्यावा.
- विजय पाटील,
आगारप्रमुख, मालेगाव