टुडे १ ॲंकर
(एसटीचे चित्र वापरावे)
---
दिवाळीत एसटी धावणार अतिरिक्त फेऱ्यांसह
जळगाव विभागाकडून सुविधा; महिला सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणीला शिथिलता
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाने विशेष नियोजन केले आहे. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सुरत या प्रमुख मार्गांवर १०० हून अधिक जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी प्राथमिक स्वरूपात २५० जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, सुमारे ४० हजार किलोमीटर अतिरिक्त प्रवास बसेसकडून केला जाणार आहे.
दिवाळीच्या काळात खासगी वाहनांसह एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढते. यंदा एसटीच्या हंगामी तिकीट दरवाढीचा निर्णय रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जादा बसेसच्या नियोजनासह उपलब्ध गाड्यांचा अधिकाधिक वापर करण्यावर विभागाने भर दिला आहे.
शालेय बसही सेवेत
शाळा आणि महाविद्यालयांना ३० ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्या लागणार असल्याने जिल्ह्यातील विविध आगारांच्या ७६ शालेय व मानव विकास बसेस या कालावधीत नियमित सेवेतून तात्पुरत्या स्थगित करण्यात येणार आहेत. या बसेस विविध लांब पल्ल्यांच्या मार्गांवर प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या काळात अतिरिक्त वाहतुकीची सोय होणार आहे.
पुणे-मुंबईसाठी आरक्षण
दिवाळीच्या काळात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पिंपरी-चिंचवड येथून जळगावकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी २७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान धावणाऱ्या बसेसचे आगाऊ आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवाळीनंतर पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही आरक्षणाची सुविधा सुरू राहणार आहे.
चौकट
एनसीएमसी कार्डला शिथिलता
महिला प्रवाशांना तिकीट दरात पूर्वीप्रमाणेच ५० टक्के सवलत लागू राहणार आहे. एनसीएमसी कार्डच्या वापराबाबत महिला प्रवाशांना तूर्त शिथिलता देण्यात येत आहे. मात्र, ज्या महिलांची एनसीएमसी कार्ड नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन एसटी विभागाने केले आहे.
कोट
दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेत सेवा देण्याचा विभागाचा प्रयत्न राहणार आहे.
- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, जळगाव एसटी विभाग.