पान तीन मेन
------------------
15218
नाशिक : फराळाचे पार्सल विदेशात पाठविण्यासाठी त्याची बांधणी करताना टपाल कर्मचारी.
दिवाळी फराळातून टपाल कार्यालयास आठ लाखांचे उत्पन्न
विदेशात राहणाऱ्या बांधवांनाही घरगुती फराळाचा आस्वाद; पार्सलचा ओघ सुरूच
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक ता.१२: दिवाळी फराळ पार्सलने जीपीओ टपाल कार्यालयास केले लखपती. अवघ्या वीस दिवसात पार्सलमधून सुमारे आठ लाखाचे उत्पन्न कार्यालयास मिळाले. अद्यापही पार्सल करणाऱ्यांचा ओघ सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे टपाल कार्यालयाच्या तिजोरीत लाखांची भर तर पडलीच आहे. शिवाय विदेशात राहणाऱ्या बांधवांनाही घरगुती फराळाचा आस्वाद घेता आला आहे.
शिक्षण, नोकरी अशा विविध कारणांनी बहुतांशी शहरवासीय देश विदेशात वास्तव्यास आहे. दिवाळी सारख्या सणाला देखील घरी येणे त्यांना शक्य होत नाही. अशा बांधवांना कुटुंबाचा सहवास लाभावा. दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेता यावा. यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून टपाल विभागाच्या पार्सल सेवेच्या माध्यमातून दिवाळी फराळाचे पार्सल त्यांच्यापर्यंत पोहोचविले जातात. यंदा देखील शेकडो दिवाळी फराळाचे पार्सल देश-विदेशात टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पोहोच झाले आहे.
२३ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबपर्यंत जीपीओ टपाल कार्यालयाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशांमध्ये १२९ पार्सल पाठविण्यात आले. त्यातून जीपीओ टपाल कार्यालयास ७ लाख ८९ हजार ३८० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अद्यापही नागरिकांचा फराळाचे पार्सल पाठवण्याचा ओघ सुरूच आहे. गुरुवारी देखील चार ग्राहकांकडून फराळाचे पार्सल विदेशात पाठविण्यासाठी बुक केल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पोहोच झालेल्या दिवाळी फराळाचा आस्वाद घेणे देश विदेशातील बांधवांना शक्य झाले.
.............
जर्मनी, ग्रेट ब्रिटनमध्ये सर्वाधिक पार्सल
दरवर्षी अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये दिवाळी फराळाचे सर्वाधिक पार्सल पोहच होत असतात. यंदा मात्र अमेरिकेत काही वस्तू पाठविण्यावर असलेल्या बंदीमुळे जर्मनी आणि ग्रेट ब्रिटनमध्ये सर्वाधिक पार्सल पाठविण्यात आल्याची माहिती टपाल कार्यालयामार्फत देण्यात आली.