दिवाळीच्या फराळासाठी
आचारींची लगबग
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प, ता. ७ : प्रकाश आणि मांगल्याचा दिपोत्सव सुरु झाल्यानंतर दिवाळीच्या फराळाची सर्वत्र लगबग सुरु आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरी व ग्रामीण भागातील महिलांची फराळ बनविण्यासाठी धावपळ होत आहे. दुष्काळी परिस्थिती बाजूला ठेवून सर्वच कुटुंबिय आपापल्या परीने सणाचा गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दिवाळीचा सण हा गोडवा व चैतन्य आणणारा आहे. घरोघरी दिवाळीच्या फराळाची लगबग सुरू झाली आहे. पूर्वी घराघरांत महिला एकत्र येऊन चकल्या, करंज्या, लाडू, चिवडा, शंकरपाळे असे विविध पदार्थ तयार करत असत. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावामुळे आता अनेक महिला घरगुती फराळ बनविण्यासाठी आचाऱ्यांकडून तयार करुन घेतात. गोड पदार्थ १५० रुपये तर तिखट पदार्थ १२० रुपये किलो दराने आचारी बनवून देत आहेत. शेव, पापडी, लाडू, शंकरपाळे, बालुशाही, गुलाबजाम, बुंदी लाडू, चिवडा आदी पदार्थांना प्राधान्य दिले जात आहे.
फराळाचे साहित्य खरेदी करुन नंबर लावत आचाऱ्याकडून पदार्थ तयार करण्यात अनेक जण व्यस्त आहेत. येथील सटाणा नाका, डिके चौक, रावळगाव नाका, संगमेश्वर, सोयगाव आदींसह शहरातील विविध भागात आचाऱ्यांनी फराळ बनवून देण्याचे स्टॉल लावले आहेत.