प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नाबाबत जि.प.ला साकडे
----------------------------------------
दिवाळी सुट्टीतील प्रशिक्षण ऑनलाइन घेण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर,ता.२२ : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना साकडे घालून निवेदन देत प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
वेतनश्रेणी प्रशिक्षण, विस्थापित शिक्षकांचे समायोजन, वेतन वितरणासह पाच प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी श्री पवार यांच्या समवेत शिक्षकांच्या प्रश्नांवर विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
दिवाळीच्या सुट्टीत वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रशिक्षण होणार असून याच कालावधीत जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांची गैरसोय टाळण्यासाठी हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावे. २०२३ व २०२५ मधील बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या शिक्षकांना समायोजनाची संधी उपलब्ध करून द्यावी. दर महिन्याचे वेतन उशिरा होत असते. किमान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन एक नोव्हेंबरपूर्वी अदा करावे.कंत्राटी व मानधन तत्त्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी जून पासून मानधन मिळण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
दरम्यान विद्यार्थ्यांच्या गणवेशासंदर्भात मुख्याध्यापकांना बजावण्यात आलेल्या नोटिसांबाबतही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लक्ष घालून अशीही मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी राज्य सरचिटणीस भरत शेलार, राज्य संघटक प्रकल्प पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील गांगुर्डे, जिल्हा नेते अम्रपाल आहेर, तालुका सरचिटणीस सतीश राजगिरे, संतोष चोळके व प्रशांत पवार उपस्थित होते.
नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना निवेदन देताना शिक्षक भारती संघटनेचे भरत शेलार, सुनील गांगुर्डे.