--
पोलिसांचा ‘माझा शेजारी, खरा पहारेकरी’वर भर
दिवाळी सुट्ट्यांत चोर-घरफोड्या रोखण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : दिवाळीनिमित्त शाळा-महाविद्यालय, शासकीय नोकरदारांसह औद्योगिक वसाहतीलाही सुट्ट्या असल्याने या काळात अनेक जण कुटुंबीयांसह गावी वा पर्यटनासाठी परगावी जातात. यामुळे चोरट्यांना आयती संधी मिळते. त्यामुळे पोलिसांसमोर या काळात चोऱ्या- घरफोड्या रोखण्याचे आव्हान असून, ‘माझा शेजारी, खरा पहारेकरी’ या उपक्रमांवर भर दिला आहे. खबरदारीसाठी गस्ती वाढविण्यासह उपाययोजनांवर भर दिला आहे.
दीपोत्सवाला गुरुवार (ता. ५) पासून प्रारंभ होतो आहे. दिवाळीत बहुतांशी कुटुंबीय दीपावली पाडव्यापासून गावी अथवा पर्यटनानिमित्ताने शहराबाहेर जाण्याचे नियोजन करतात. दिवाळीत हीच संधी साधून बंद घरे पाहून चोरट्यांकडून हात की सफाई केली जाते. चोऱ्या - घरफोड्या टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात असून, ‘माझा शेजारी, खरा पहारेकरी’ या उपक्रमावर भर दिला आहे. दिवाळी अनेक घरे, फ्लॅट्स बंद असल्याचे हेरून चाेेरटे दिवसा रेकी करून रात्री घरफोड्या करतात. त्यामुळे शहरातील तेराही ठाण्याच्या हद्दीतील सोसायट्या, अपार्टमेंट, बंगले, रो हाऊस या ठिकाणी खबरदारीबाबत संबंधित हद्दीत नागरिकांशी संवाद साधला जात आहे. ठाण्याव्यतिरिक्त पथके गस्तीसाठी तैनात करण्यात आली आहे. तर नागरिकांनाही आपल्या घराच्या सुरक्षिततेबाबत आपल्या शेजाऱ्यांना सांगून जाण्याचे, तसेच मौल्यवान वस्तू घरात न ठेवण्याबाबत आवाहन केले आहे.
...
पोलिसांचे आवाहन
- दागिने, पैसे व मौल्यवान वस्तू घरात न ठेवता सुरक्षितस्थळी ठेवा
- गावी जाताना मौल्यवान वस्तू सांभाळा
- सोसायटी, बंगला, घराबाहेर सीसीटीव्ही कार्यान्वित ठेवा
- ‘डायल ११२’वर संपर्क साधा
- सोशल मीडियावर परगावी असल्याचे लोकेशन अपलोड करु नये
- सोसायट्या, बंगले, रो हाऊसबाहेर सुरक्षारक्षक नेमावा
- गावी जाणार असल्याची माहिती शेजाऱ्यांना द्यावी
--- कोट
(फोटो वापरावा)
दिवाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाणेनिहाय दिवसरात्र गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनीही परगावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी, मौल्यवान वस्तू घरात ठेऊ नये. पोलिसांची पथके शहरभर तैनात केली आहेत.
- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा, नाशिक.