रेल्वे प्रवासासाठी वेटिंग, खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट महाग
दिवाळीच्या सुट्यांतील पर्यटनामुळे खिसा हलका, विमान तिकीट दरांमध्ये वाढ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : इंधनाचे वाढलेले दर, महागाईचा झालेला भडका, त्यात हंगामात मागणीत वाढ झाल्याने खासगी ट्रॅव्हल्सने प्रवाशी तिकिटाच्या दरांमध्ये वाढ केली आहे. एसटी महामंडळाने यंदा हंगामी भाडेवाढ केली नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु रेल्वे प्रवासासाठी मोठी प्रतीक्षा यादी, तर विमानसेवेची महाग तिकिटे यामुळे दिवाळीच्या सुट्यांमुळे पर्यटकांना खिसा हलका करावा लागतो आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्या असून, मोठ्या वीक एंडमुळे शासकीय व खासगी आस्थापनांनाही पाच ते सात दिवस सुट्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा ओघ पर्यटनाकडे दिसतो आहे. तसेच अनेक जण सण साजरा करण्यासाठी मुळ गावाचा रस्ता धरत आहेत. दिवाळी सणाच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढताच वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. रेल्वेचे आरक्षण महिनाभरापूर्वीच फुल्ल झाल्याने प्रवाशांचा भार खासगी बसेस आणि विमानांवर पडतो आहे. याचाच गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी नेहमीच्या दरांपेक्षा २० ते ५० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ केली आहे. दुसरीकडे, सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करत हजारो अतिरिक्त बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत.
खासगी ट्रॅव्हल्सकडून पुणे, धुळे, छत्रपती संभाजीनगर या वर्दळीच्या मार्गांसह मुंबई व इतर शहरांसाठी गाड्या उपलब्ध केल्या आहेत. परंतु या प्रवासासाठी नियमित तिकीट दरांच्या तुलनेत २० ते ५० टक्के जादाची रक्कम आकारली जाते आहे.
-----
भाडेतत्त्वावरील कार परवडेना...
सहकुटुंब पर्यटनाचा आनंद घेताना अनेकांकडून थेट भाडेतत्त्वावर गाडी बुक केली जात असते. परंतु इंधनदरवाढीमुळे विना एसी १० ते १२ रुपये, तर एसी सुविधेसह १५ ते १७ रुपये प्रति किलोमीटर या दराने भाडे आकारले जात असल्याने, कार भाडेतत्त्वावर घेणेदेखील परवडत नसल्याची प्रवाशांची ओरड आहे.
----