टुडे पान ४, मेन फिचर
---
खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दीड हजारांवर
दिवाळीत गावी येणे महागले; वाहतूक कोंडीमुळे प्रवासालाही चार तास अधिक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची दिवाळी सणासाठी गावी परतण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, सणासुदीच्या काळातील वाढती प्रवासी गर्दी आता त्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे. पुणे–जळगाव मार्गावरील खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर दीड हजार रुपयांच्या पुढे गेल्याने प्रवाशांना नियमित दराच्या तुलनेत जवळपास दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच पुणे ते नगरदरम्यान होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा कालावधीही वाढला आहे.
दुसरीकडे, भाऊबीजेनंतर पुन्हा पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढणार असल्याने तिकीट दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जळगाव शहरातून पुण्यासाठी दररोज सुमारे ६० ते ६५ खासगी ट्रॅव्हल्स धावतात. तर मुंबईसाठी सुमारे २५ ट्रॅव्हल्सची वाहतूक सुरू असते. शिक्षणासाठी पुण्यात असलेले विद्यार्थी, नोकरी करणारे तरुण, व्यावसायिक आणि कुटुंबीय दिवाळीच्या सुटीत मोठ्या संख्येने जळगावकडे परततात. त्यामुळे सणाच्या काही दिवस आधीपासूनच पुणे–जळगाव मार्गावरील प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे.
तिकिटाची दुप्पट दरवाढ
सामान्य दिवसांत पुणे–जळगाव प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट साधारणतः ६०० ते ८०० रुपयांपर्यंत असते. मात्र, दिवाळीच्या गर्दीचा परिणाम म्हणून सध्या हेच दर दीड हजार रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत. नियमित दराच्या तुलनेत प्रवाशांना जवळपास दुप्पट रक्कम मोजावी लागत असल्याने कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
कोंडीमुळे अतिरिक्त वेळ
तिकीट दरवाढीबरोबरच प्रवाशांना वेळेचाही मोठा फटका बसत आहे. पुणे ते नगरदरम्यान महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होत असल्याने खासगी ट्रॅव्हल्सना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. सामान्यतः आठ ते दहा तासांत पूर्ण होणारा पुणे–जळगाव प्रवास सध्या १२ ते १४ तासांपर्यंत लांबत आहे. त्यामुळे सकाळी आठपर्यंत येणाऱ्या ट्रॅव्हल्स या दहानतंर शहरात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंडासोबतच अतिरिक्त चार तासांचा प्रवास आणि शारीरिक त्रासही सहन करावा लागत आहे.
चौकट
परतीच्या प्रवासातही दरवाढीची शक्यता
दिवाळीसाठी जळगावला आलेले विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक भाऊबीजेनंतर पुन्हा पुण्याकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे जळगावहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्येही प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. परतीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षणाची मागणी वाढत असल्याने ट्रॅव्हल्सचे तिकीट दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीला गावी येतानाच नव्हे, तर सणानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी परततानाही प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागण्याची चिन्हे आहेत.
कोट
दिवाळीपूर्वी पुण्यावरून ट्रॅव्हलने जळगावला येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. एसटीच्या तिकिटाच्या किमतीपेक्षा दीडपट भाडेवाढ नियमानुसार करू शकतात. दरवर्षी दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांचा ओघ वाढल्यावर काही प्रमाणात तिकिटाच्या दरात वाढ होत असते.
- सुशील नेतले, ट्रॅव्हल व्यावसायिक, जळगाव.
.......