टुडे पान ४, मेन फिचर
--
दिवाळी मुहूर्तावर दुचाकी, चारचाकी विक्रीचा धमाका
‘आरटीओ’त ऑक्टोबरमध्ये ६,२४८ तर नोव्हेंबरच्या १२ दिवसांत २,२०७ नवीन वाहनांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : दिवाळीचा सण, लक्ष्मीपूजन आणि त्यानिमित्ताने मिळणाऱ्या विविध सवलतींचा फायदा घेत जळगावकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. सणासुदीच्या मुहूर्तावर नवीन वाहन घरी आणण्याची परंपरा आणि वाहन कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या आकर्षक ऑफर्समुळे ऑक्टोबर महिन्यात वाहन बाजारपेठेत चांगली उलाढाल झाल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ऑक्टोबर महिन्यात जळगाव आरटीओ कार्यालयात तब्बल ६ हजार २४८ वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक असून चारचाकी वाहनांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर बुकिंग केले. विशेषतः दुचाकी खरेदीकडे तरुणांचा कल दिसून आला. तर कुटुंबाच्या गरजा, सुरक्षित प्रवास आणि वाढती उपयुक्तता लक्षात घेऊन अनेकांनी चारचाकी वाहनांना पसंती दिली. ऑक्टोबर महिन्यात दुचाकींच्या नोंदणीचा आकडा सुमारे ४ हजार ८५५ इतका असून, मोटार कारची नोंदणी ६८८ झाली आहे.
दुचाकी खरेदीत उत्साह
आरटीओच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये दुचाकींच्या नोंदणीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. दुचाकींच्या एकूण नोंदणीमुळे वाहन बाजारपेठेतील या विभागाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि दैनंदिन प्रवासासाठी दुचाकी हे सर्वसामान्यांचे प्रमुख साधन असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीला अधिक पसंती मिळाली.
चारचाकींचीही खरेदी
दुचाकींसोबतच चारचाकी वाहनांच्या खरेदीतही उत्साह दिसून आला. ऑक्टोबर महिन्यात ६८८ मोटार कारची नोंदणी झाली. दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी आधीच बुकिंग केले होते. काही ग्राहकांनी सणाच्या दिवसांत वाहनांची डिलिव्हरी घेतली. विविध वाहन कंपन्यांकडून देण्यात आलेल्या सवलती, आकर्षक फायनान्स योजना आणि कमी डाउन पेमेंटच्या पर्यायांमुळे ग्राहकांना वाहन खरेदी करणे सोयीचे झाले.
नोव्हेंबरची नोंद
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या १२ दिवसांत जळगाव आरटीओ कार्यालयात एकूण २ हजार २०७ वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये १ हजार ७८८ दुचाकी आणि २८५ मोटार कारची नोंद आहे. याशिवाय कृषी ट्रॅक्टर, मालवाहू वाहने, प्रवासी वाहने आणि इतर वाहनांचाही समावेश आहे. दिवाळीच्या काळातील वाहन खरेदीचा उत्साह नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातही कायम असल्याचे या आकडेवारीतून दिसते.
चौकट
वाहन बाजारपेठेला सणासुदीचा आधार
दिवाळी हा वाहन उद्योगासाठी महत्त्वाचा खरेदीचा हंगाम मानला जातो. नवीन वाहन खरेदीसाठी शुभमुहूर्त, कुटुंबाच्या गरजा आणि वाहन कंपन्यांच्या सवलती यामुळे या काळात विक्रीला चालना मिळते. ऑक्टोबरमधील वाहन नोंदणीचा सहा हजारांचा टप्पा ओलांडणारा आकडा जळगावच्या वाहन बाजारपेठेतील सकारात्मक चित्र दर्शवित आहे.