ॲंकर
NSK26H34693
जळगाव : चिमुकले श्रीराम मंदिरात उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील विद्यार्थ्यांनी सजविलेल्या १ हजार १११ पणत्या. शेजारी उपस्थित मान्यवर.
हजारो दिव्यांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर
दिव्यांगांनी सजविल्या पणत्या, मान्यवरांनी केले कौतुक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : जिल्ह्यातील रुशिल मल्टिपर्पज फाउंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपली आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. चिमुकले श्रीराम मंदिरात ११११ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
रुशिल मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांनी सजवलेल्या विविधरंगी पणत्या प्रज्वलित करून हा उपक्रम चिमुकले श्रीराम मंदिरात पार पडत असतो. यंदा देखील चिमुकले श्रीराम मंदिरात ११११ पणत्या प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मिहिका घुगे, जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन, ज्योती जैन, पोलिस अधीक्षक यांच्या पत्नी सानिका धिवरे, ह.भ.प. दादा महाराज जोशी, नगरसेवक अमित काळे यांच्यासह जैन उद्योग समूहाचे मीडिया संचालक अनिल जोशी, सुनील खैरनार, माजी नगरसेवक पांडुरंग (बंडूदादा) काळे, परेश सनांसे, वैशाली सनांसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रतर्फे आयोजित हा उपक्रम स्तुत्य असून दिव्यांग मुलांनी केलेली मेहनत आणि कलाकुसर कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. उडाण दिवाळीच्या अगोदर दिव्यांग विद्यार्थी स्वतः ३ लाख पणत्या सुशोभित करतात, त्यातून त्यांना रोजगार देखील मिळतो. दीपोत्सवाच्या माध्यमातून सर्वांच्या आयुष्यात सकारात्मतेचा प्रकाश पडावा आणि दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक चांगला व्हावा, हाच आमचा उद्देश असल्याचे हर्षाली चौधरी यांनी सांगितले. उपक्रमासाठी उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, प्रवीण चौधरी, हेतल पाटील, जयश्री पटेल, महेंद्र पाटील, कल्पना रोटे, प्रतिभा पाटील, रितेश पाटील, वनमाला कोळी यांनी परिश्रम घेतले. अक्षय नेहे यांनी सूत्रसंचालन केले.