लोगो : सोमवारची मुलाखत
--
फोटो : H35045
संशोधनातून जर्मनीचे नागरिकत्व; भविष्यात मायदेशी सेवेचा ध्यास
डॉ. वडगावकर : परदेशात भारतीयांचा प्रभाव वाढता, महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी
लीड
नाशिकमध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या डॉ. आदित्य अतुल वडगावकर यांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण केले. अमेरिकेत शिक्षण घेत असताना, कोरोनाकाळात उद्भवलेल्या परीस्थितीत अनपेक्षितरीत्या त्यांनी थेट जर्मनी गाठले. वैद्यकीय सेवा, संशोधन कार्यातील त्यांच्या योगदानाची दखल घेता, त्यांना जर्मनीचे नागरिकत्व बहाल केले आहे. आजवरच्या प्रवासाचा उलगडा करताना, भविष्यात मायदेशी सेवा बजावण्याचा ध्यास डॉ. वडगावकर यांनी व्यक्त केला. परदेशात भारतीयांचा वाढता प्रभाव, महत्त्वाच्या पदांवरील जबाबदारी दिली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
-
प्रश्न : तुमचा शैक्षणिक प्रवास कसा राहिला?
डॉ. आदित्य वडगावकर : माझे दहावीपर्यंतचे शिक्षण नाशिकमधील किलबिल शाळेत, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आरवायके महाविद्यालयातून झाले. बारावीनंतरच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्तर महाराष्ट्रात प्रथम आणि संपूर्ण महाराष्ट्रात अकरावा क्रमांक पटकावला. या यशामुळे मुंबईतील नामांकित केईएम रुग्णालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०२० मध्ये मला युकेमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची दोन महिन्यांची व्हिजिटिंग स्टुडंट स्कॉलरशिप मिळाली.
--
कोरोना संकटात ऑक्सफर्डमधून जर्मनीला जाण्याचा योग कसा आला?
: ऑक्सफर्डमध्ये असतानाच कोरोनाची पहिली लाट आली आणि जगभरात लॉकडाउन जाहीर झाले. युकेमधील रुग्णालयांनी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण थांबवले आणि भारतात परतण्याचे मार्गही बंद झाले. या कठीण काळात जर्मनीतील एका प्राध्यापकांशी परिचय झाला. त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीच्या विशेष नियमाअंतर्गत जर्मनीचा तात्काळ व्हिसा मिळाला आणि तेथील ऑर्थोपेडिक्स विभागात कोविड काळातील वैद्यकीय सेवेत मदतीचा हातभार लावला.
---
जर्मनीत कायमस्वरूपी वैद्यकीय शिक्षण आणि पीएचडी करण्याची संधी कशी उपलब्ध झाली?
: सुरुवातीच्या काळात माझे काम पाहून तेथील वरिष्ठ डॉक्टरांनी तिथेच संशोधन करण्याची संधी देऊ केली. त्यानंतर भारतात परतलो आणि नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये सहा महिने वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. यानंतर मी ऑर्थोपेडिक्समध्ये पीएचडी करण्यासाठी पुन्हा जर्मनीला गेलो. आवश्यक वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, त्यांनी मला तिथेच ऑर्थोपेडिक आणि ट्रॉमा सर्जन म्हणून कायमस्वरूपी प्रशिक्षणाची संधी दिली. सध्या या सहा वर्षांच्या प्रशिक्षणाच्या पाचव्या वर्षात असून, माझे पीएचडीचे संशोधनही पूर्ण झाले आहे.
---
वडिलांचा वैद्यकीय वारसा, प्रस्थापित रुग्णालय असतानाही जर्मनीत जाण्यामागे काय विचार होता?
: वडिलांनी आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. मात्र, केवळ त्यांचा तयार वारसा पुढे न चालवता मला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी वेगळे करायचे होते. जर्मनीमध्ये ऑर्थोपेडिक्स आणि इम्प्लांट्सचे तंत्रज्ञान अत्यंत प्रगत आहे. तेथील आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान शिकून, भविष्यात आपल्या नाशिकमधील रुग्णालयात आणि भारतातील रुग्णांना जागतिक दर्जाची उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. विशेष म्हणजे, या प्रवासात माझ्या आई-वडिलांनी कोणत्याही अटीशिवाय मला नेहमीच खंबीर पाठिंबा दिल्याने हा प्रवास साध्य करू शकलो.
---
तुम्हाला जर्मनीचे नागरिकत्व मिळाले असून, तेथील महापौरांकडून गौरव झाला आहे. तो अनुभव कसा होता?
: जर्मनीतील मॅनहाइम शहरात वास्तव्यास असताना वैद्यकीय सेवतील कार्याची दखल घेत मला नागरिकत्व बहाल करण्यात आले. नागरिकत्व मिळाल्यानंतर दरवर्षी शहराच्या महापौरांकडून नवीन नागरिकांचा विशेष सत्कार कार्यक्रम आयोजित केला जातो. या वर्षी नागरिकत्व मिळालेल्या सुमारे दीड हजार लोकांमधून, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल घेत महापौरांनी संवाद साधण्यासाठी निवडलेल्या तीन प्रमुख व्यक्तींमध्ये माझा समावेश होता. स्थानिक जर्मन वृत्तपत्रातही या मुलाखतीची आणि माझ्या प्रवासाची विशेष दखल घेतली. हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता.
--
भारत आणि जर्मनीतील आरोग्य व्यवस्थेत तुम्हाला कोणता महत्त्वाचा फरक जाणवला?
: जर्मनीमध्ये प्रत्येक नागरिकाचा आरोग्य विमा अनिवार्य असतो. यामुळे गरीब असो किंवा श्रीमंत, प्रत्येकाला कोणत्याही आर्थिक भेदभावाशिवाय सर्वोत्तम आणि मोफत उपचार मिळतात. आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर सहज उपलब्ध होतात, तिथे अपॉइंटमेंटसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागते; पण सरकारी रुग्णालयांमध्येही सर्वसामान्य रुग्णाला मिळणाऱ्या उपचारांचा दर्जा आणि यंत्रणा उत्कृष्ट आहे.
---
परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण किंवा करिअर करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
: भारतीय विद्यार्थी सहसा भाषा सोपी असल्याने केवळ अमेरिका किंवा इंग्लंडचा विचार करतात. मात्र, जर्मनीसारख्या युरोपियन देशांमध्येही वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो आणि स्थानिक भाषा शिकावी लागते. सध्या जर्मनीत आयटी क्षेत्रासोबत भारतीय परिचारिका मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. योग्य मार्गदर्शन आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर जागतिक स्तरावर भारतीय डॉक्टरांसाठी मोठे भविष्य आहे.