टुडे एक : सेकंड मेन
---
उपचाराला आलेल्या तरुणीचे डॉक्टरकडून लैंगिक शोषण
लग्नाचे वचन देत चार महिने अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : तांबापुरा मच्छी बाजार रोडवरील दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे वचन देत, नंतर इंजेक्शन देतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन डॉक्टरने सलग चार महिने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंध ठेवण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित डॉक्टर ताबिश रजा सय्यद अली अंजुम (वय २८, मास्टर कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तरुणी शिक्षण घेत असून औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत आई-वडील व भावांसह राहते. १७ एप्रिल २०२५ रोजी तब्येत खराब झाल्याने ती उपचारासाठी डॉ. ताबिश रजा याच्याकडे गेली. तेथे तिची डॉक्टरशी ओळख झाली. उपचारानंतर डॉक्टरने तिचा मोबाईल क्रमांक घेत दवाखान्याच्या ग्रुपमध्ये समावेश केला. त्यानंतर दोघांमध्ये फोन व मेसेजद्वारे संपर्क सुरू झाला.
डॉक्टरने साधली जवळीक
मोबाईलद्वारे तरुणीशी संपर्क वाढवत डॉक्टरने तिच्याशी जवळीक साधली. विविध कारणांनी तिला दवाखान्यात बोलावून घेतले. उपचारादरम्यान इंजेक्शन देतानाचा व्हिडीओ आपल्याकडे असल्याचे सांगत तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला नियंत्रणात ठेवत होता.
बळजबरीने संबंध
त्यानंतर डॉक्टरने तरुणीला कारमधून मेहरुण तलाव परिसरात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर हॉस्पिटलमध्येही तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले जात होते. आठवड्यातून एक-दोन वेळा हा प्रकार सुरू होता. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सलग चार महिने तिचे लैंगिक शोषण केले. तसेच लग्नाचे वचन देत संबंधांसाठी दबाव टाकला व नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
संबंध तोडले तरी...
गैरप्रकाराची जाणीव झाल्यानंतर तरुणीने डॉक्टरशी संबंध तोडून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, एप्रिल २०२६ मध्ये डॉक्टरने पुन्हा फोन करून भेटण्यास सांगितले. त्यावेळी तिने यापूर्वी घडलेला प्रकार डॉक्टरच्या आई-वडिलांना सांगितला. त्यांच्याकडूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तिने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
चौकट
वचन पीडितेला..लग्नासाठी दुसरी
पीडित तरुणी वारंवार नकार देत असतानाही तिच्यावर बळजबरी करण्यात आली. लग्नाचे खोटे वचन देत तिचे सलग लैंगिक शोषण सुरू होते. दरम्यान, डॉक्टर दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याची माहिती मिळाल्याने तिने त्याला जाब विचारला. मात्र, त्याच्याकडून निराशाजनक प्रतिसादासह धमकी मिळाल्याने अखेर तिने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून कथित डॉक्टर ताबिश रजा सय्यद अली अंजुम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक राजश्री पाटील तपास करीत आहेत.