माजी नगरसेवकावर कुत्रा भुंकल्याने वाद
जळगाव, ता. ५ : पाळीव कुत्रा भुंकल्याने झालेल्या वादातून तिघांनी घरात घुसून कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना मेहरूण परिसरात घडली आहे. या हल्ल्यात घरातील महिला व मुले जखमी झाले असून, मारहाणीदरम्यान सोन्याचे दागिने व हातातील घड्याळ तोडून नुकसान करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (ता.३) रात्री नऊच्या सुमारास घडली.
औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, मंगळवारी (ता.३) रात्री परेश पांडुरंग वंजारी (वय ५३, लक्ष्मी नगर, मेहरूण, जि. जळगाव) यांचा कुत्रा माजी नगरसेवक ईकबाल पिरजादे याच्यावर भुंकला. याचा राग आल्याने त्यांनी कुत्र्याचा मालकाचा मुलगा सौरभ याला शिवीगाळ करत दमदाटी केली. वाद वाढत गेला. दोन्ही बाजूने वाद झाल्यानंतर संतापलेल्या ईकबाल पिरजादे, गाझी ईकबाल पिरजादे (दोघे रा. पिरजादे वाडा, मेहरूण) यांच्यासह इतर दोघांनी लाकडी दांडके व धारदार शस्त्र घेऊन घराचे कंपाउंड ओलांडून आत प्रवेश करुन कुटुंबीयांना मारहाण करुन जखमी केले. हल्ल्यात महिलेचे मंगळसूत्र व मुलाची सोन्याची चेन तसेच हातातील घड्याळ ओढाताणीत तोडून नुकसान करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.