धुळे टुडे २ साठी अँकर...
---
फोटो- NSK26H34009
धुळे : घरेलू कामगार महिलांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमप्रसंगी उपस्थित कामगार महिलांसह मान्यवर.
---
घरेलू कामगार महिलांनी सक्षम नेत्या बनावे
---
अरुणा शिंदे; नेतृत्व विकासासाठी ‘सेकंड लाईन लीडरशिप ट्रेनिंग’
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३० : घरेलू कामगार महिलांनी केवळ आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या महिला न राहता, समाजपरिवर्तनाच्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या सक्षम नेत्या बनावे, महिलांनी स्वतः नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून इतर महिलांना संघटित करावे आणि घरेलू कामगारांच्या हक्कांसाठी सक्रियपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन मास्टर ट्रेनर अरुणा शिंदे यांनी केले.
नवनिर्मिती घरेलू कामगार संघटनेच्यावतीने धुळे शहरातील साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात घरेलू कामगार महिलांसाठी सेकंड लाईन लीडरशिप ट्रेनिंग झाली. महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, संघटनात्मक कामकाजाची समज वाढविणे आणि संघटनेची दुसरी नेतृत्वफळी सक्षम करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. या प्रशिक्षणात मास्टर ट्रेनर श्रीमती शिंदे यांनी उपस्थित महिलांना नेतृत्व विकास, संघटनात्मक बांधणी, निर्णयक्षमता आणि सामूहिक कार्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. घरेलू कामगार महिलांच्या नेतृत्वातूनच कामगारांच्या हक्क, सन्मान आणि सामाजिक न्यायाची चळवळ अधिक व्यापक होऊ शकते म्हणून घरेलू कामगार महिलांना केवळ संघटनेच्या सभासद म्हणून नव्हे तर सक्षम नेतृत्व म्हणून पुढे आणणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि चळवळीचे नेतृत्व अधिक व्यापक करणे, या दृष्टीने हे प्रशिक्षण अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष शहाजी शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी सपना गोसावी यांनी चळवळीची प्रेरणादायी गीते सादर करून महिलांमध्ये उत्साह, एकजूट आणि संघर्षाची प्रेरणा निर्माण केली. गीतांच्या माध्यमातून महिलांना संघटित राहण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी सामूहिकपणे लढण्याचा संदेश देण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. शिंदे, संघटक दिपिका घोरपडे, आम्रपाली शिरसाट, सविता खेडवणकर, रुक्सार शेख यांनी परिश्रम घेतले.
---