धुळे ः टुडे १ साठी
--
बीएसएनएल गोदामातील तार चोरी उघड
-
दोंडाईचातील घटना : ९० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : दोंडाईचा शहरातील दाऊळ रोडवरील बीएसएनएल कंपनीच्या गोदामातून अंडरग्राउंड केबलची तांब्याची तार चोरीला गेल्याचा गुन्हा दोंडाईचा पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून १२ किलो तांब्याची तार, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि ॲपे रिक्षा, असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
रमेश ऊर्फ लांबा मालचे (वय ३५, रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा) आणि आकाश रोहिदास पावरा (वय २८, रा. सिंधी कॉलनी, दोंडाईचा), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चोरीप्रकरणी नऊ ऑक्टोबरला दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. २७ जानेवारीला रात्री अकरापासून १९ सप्टेंबरला सकाळी आठपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पाच नोव्हेंबरला पहाटे उपनिरीक्षक इमरान खान हे रात्रगस्तीवर असताना उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवरून गरीब नवाज कॉलनीच्या दिशेने जाणारी ॲपे रिक्षा संशयास्पद वाटल्याने त्यांनी ती थांबवली.
रिक्षातील रमेश मालचे आणि आकाश पावरा यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशीत त्यांनी अन्य साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. चोरीची तार विक्रीसाठी नेत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीची १२ किलो तांब्याची तार, पाच हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजनकाटा आणि ७० हजार रुपये किमतीची (एमएच २० बीटी ००३७) अॅपे रिक्षा जप्त करण्यात आली. या गुन्ह्यातील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात दोंडाईचा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश सोनवणे, इमरान खान, हिरालाल सूर्यवंशी, प्रवीण निकुंभे, नीलेश हालोरे, नीलेश धनगर, अमिन शाह यांनी ही कारवाई केली.