(स्वाती चव्हाण यांचा फोटो वापरावा)
....
डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरण (लोगो करणे)
-------------
डॉ. स्वाती चव्हाण
यांना जामीन मंजूर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. मनिषा नीलेश जेजुरकर यांच्या आत्महत्याप्रकरणात संशयित म्हणून नाव असलेल्या विभागप्रमुख डॉ. स्वाती नकुल वंजारी ऊर्फ डॉ. स्वाती शंकर चव्हाण यांना नाशिकच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी (ता.५) नियमित जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि अटी-शर्तींवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. पाटील यांनी हा आदेश दिला.
गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार डॉ. मनीषा जेजुरकर यांनी ७ मार्च २०२६ ला मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ असून, त्यांचे विभागप्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे व त्यावरून कौटुंबिक वाद निर्माण झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता. पतीकडून होणारी अवहेलना आणि मानसिक छळामुळे डॉ. मनीषा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद होते.
सुनावणी दरम्यान डॉ. स्वाती चव्हाण यांच्या वकिलांनी, गुन्ह्यात डॉ. चव्हाण यांचे नाव थेट नमूद नसून, तपासादरम्यान त्यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आहे. त्या एप्रिल ते जूनदरम्यान ९ वेळा पोलिस ठाण्यात आणि ३ वेळा गुन्हे शाखेत तपासासाठी हजर झाल्या आहेत. त्यांचा मोबाईल १५ मे २०२६ पासून पोलिसांच्या ताब्यात आहे. जानेवारी २०२६ नंतर मृत डॉ. मनिषा व त्यांच्यात कोणताही संवाद झालेला नसल्याचे सांगितले.
तर, सरकारी पक्षातर्फे जामिनास विरोध करताना हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून संशयित पुराव्यांवर किंवा साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि तपासाचे कागदपत्रे विचारात घेऊन, डॉ. स्वाती चव्हाण नाशिकमधील कायमस्वरूपी रहिवासी असून त्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे त्या पळून जाण्याची शक्यता नाही. तपासाची प्रगती पाहता त्यांना पुढील तपासासाठी कोठडीत ठेवण्याची आवश्यकता भासत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.