डॉ. पाटलांना अर्ज माघार घेण्यास कोणी सांगितले?
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांचा पलटवार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : जिल्हा बँकेच्या जागावाटपात ओबीसी प्रवर्गाची जागा आम्ही माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासाठीच मागितली होती. मात्र, वाटाघाटीत ती मिळू शकली नाही. त्यांना निवडणुकीतून माघार घेण्यास कोणी सांगितले, हेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इतर नेत्यांना माहीत नाही. सतीश पाटलांचा आम्ही घात केला नाही. त्यांनी उलट आमचा ‘अपघात’ केला आहे, असा पलटवार जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार यांनी बुधवारी (ता. १८) येथे केला.
जिल्हा बँकेच्या जागावाटपात ओबीसीच्या चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे आधीच ठरले होते. त्यानुसार मी ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, गुलाबराव देवकर आणि संजय पवार यांनी आपला विश्वासघात केला, असा आरोप डॉ. सतीश पाटील यांनी मंगळवारी (ता. १७) केला होता. त्यावर उत्तर देताना अध्यक्ष पवार पत्रकारांशी बोलत होते.
श्री. पवार यांनी डॉ. पाटलांची राजकीय कुंडलीच मांडली. स्वतःच्या तालुक्यात ठराव न करणाऱ्या आणि आमदार अमोल पाटील यांच्याविरोधात भूमिका न घेणाऱ्या सतीश पाटलांनी आता आत्मपरीक्षण करावे. डॉ. पाटील जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार, तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. एवढा मोठा अनुभव असूनही त्यांनी स्वतःच्या पारोळा तालुक्यातून ठराव केले नाहीत. तिथे आमदार अमोल पाटील यांच्याविरोधात ठाम भूमिका घेतली नाही आणि आता ते आयती असलेली ओबीसी प्रवर्गाची जागा मागत होते.
कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
पारोळा तालुक्यात सतीश पाटील केवळ स्वतःसाठी पदे घेतात. सामान्य कार्यकर्त्यांसाठी ते कधीच काही मागत नाहीत. शिवाय पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांनाही ते हजर राहत नाहीत. त्यामुळे इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा त्यांनी आता स्वतःचे आत्मपरीक्षण करावे.
आमचा अपघात
चाळीसगाव पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदाचा व इतर नगरसेवकपदाचे उमेदवार उभे केले होते. त्या वेळी डॉ. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध प्रचार केला. त्यांच्यावर तर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे होती. त्याबाबत मी प्रदेशाध्यक्षांना परवानगी मागणार आहे. पारोळा पालिकेत त्यांची सून नगरसेवकपदासाठी उभी होती. ते तिला निवडून आणू शकले नाहीत. सख्ख्या पुतण्याला ते झाले नाहीत, ते पक्षाला होणार का, असा प्रश्नही श्री. पवार यांनी उपस्थित केला.