33856
पिंपळगाव बसवंत : महाविद्यालयाच्या ग्रंथालयास पुस्तके भेट देताना डॉ. दिलीप शिंदे. शेजारी प्रा. रवींद्र मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम, ग्रंथपाल प्रा. अमोल मेहेंदळे आणि विद्यार्थी.
----------
पिंपळगाव महाविद्यालयास पुस्तकांची भेट
माजी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या पुढाकारातून ग्रंथसंपदेत भर
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. २९ : पिंपळगाव बसवंत येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रंथालयास महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी १०४ पुस्तके भेट दिली. या पुस्तकांमध्ये वाणिज्य विषयाची संदर्भ पुस्तके, सनदी लेखापाल (सी. ए.) परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके तसेच इतर वाचनयोग्य पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे महाविद्यालयाच्या ग्रंथसंपदेत भर पडली आहे.
पुस्तक भेटप्रसंगी महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम, माजी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, ग्रंथपाल प्रा. अमोल मेहेंदळे आणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. रवींद्र मोरे म्हणाले, सी. ए. सारख्या आव्हानात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संदर्भ पुस्तके उपयुक्त ठरणार आहेत. तसेच, इतर पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा अभ्यासासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. डॉ. दिलीप शिंदे यांनी महाविद्यालयाशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा दिला. ते म्हणाले, या महाविद्यालयात दोनवेळा प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे महाविद्यालयाविषयी माझ्या मनात विशेष आत्मीयता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि अडचणींची मला जाणीव आहे. या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, या भावनेतून ग्रंथालयास पुस्तके भेट देताना मला आनंद होत आहे.
प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम यांनी डॉ. शिंदे यांचे आभार मानले. त्यांनी भेट दिलेल्या पुस्तकांमुळे महाविद्यालयाच्या ग्रंथसंग्रहात मोलाची भर पडली असून, विद्यार्थी आणि शिक्षकांना ज्ञानवृद्धीसाठी या पुस्तकांचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.