Latest Marathi News | किमान वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई : डॉ. सुरेश खाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Speaking at the departmental review meeting of the Labor Department, Dr. Suresh Khade

Nashik News : किमान वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई : डॉ. सुरेश खाडे

सातपूर (जि. नाशिक) : कामगार विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व विभागांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. (Dr Suresh Khade statement Action against contractors who do not pay minimum wages Nashik Latest Marathi News)

गुरुवारी (ता. १) शासकीय विश्रामगृहावर झालेल्या कामगार विभागाच्या विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. कामगार विभागाच्या प्रधान सचिव डॉ. विनिता सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक मुकेश पाटील, आरोग्य सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या सहसंचालक अंजली आढे, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव दीपक पोकळे, दा. सो. खताळ, कामगार कल्याण आयुक्त र. ग. इळवे, माथाडी सह. आयुक्त विलास बुवा, कामगार उपायुक्त विकास माळी, सहाय्यक आयुक्त सुजित शिर्के, सहाय्यक आयुक्त शर्वरी पोटे यांच्यासह विभागातील जिल्ह्यांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

डॉ. खाडे म्हणाले, की कामगार विभागाने पोलिस यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात जी बालके आढळतील, त्यांना बाल कल्याण समितीकडे हस्तांतरित करावे. कामगार विभाग, जिल्हा परिषद, महापालिका व पोलिस यंत्रणेची बाल कामगारांबाबत एकत्रितपणे बैठक घेण्यात यावी व बालकामगार विरोधी जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा. विभागात कुठेही बालकामगार आढळणार नाहीत यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करणे गरजेचे आहे असेही मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले. वेठबिगारीत आढळलेल्या मुलांचे पुनर्वसन करताना त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून इतर योजनांचादेखील लाभ देण्यात यावा. याबाबतचा अहवाल सादर करावा.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

त्याचप्रमाणे किमान वेतनाबाबतच्या प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कारवाई करून ती निकाली काढावीत. कामगार व त्यांच्या पाल्यांना मिळणारे लाभ वेळेत देण्यासाठी कार्यवाही करावी. नोंदणीकृत कारखाने सध्याच्या काळात सुस्थितीत असल्याची ऑनलाइन खात्री करावी. औद्योगिक क्षेत्रातील ज्या कंपन्यांची नोंदणी झालेली नाही, अशा कंपन्यांची नोंदणी तातडीने करावी. औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने नियुक्त केलेले डॉक्टर्स यांचा कार्य अहवालही नियमित सादर करावा. बाष्पके संचालनालयाने राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या.

आढावा बैठकीत कामगार उपायुक्त कार्यालय, माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, सुरक्षारक्षक मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, बाष्पके संचालनालय व कामगार कल्याण मंडळ यांनी केलेल्या कामांची सादरीकरणाद्वारे संबंधित विभागप्रमुखांनी माहिती दिली.

टॅग्स :NashikLabor Policy