डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; आठ लाखांना गंडा
---
कमी ‘नीट’ गुणांवर बीएएमएस प्रवेशाचे आमिष; जळगावच्या दांपत्याविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २१ : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (बीएएमएस) प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे व गुणपत्रक तयार करून एका तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जळगावातील रिंग रोडवरील ‘अभिजोत करिअर फर्म’च्या संस्थापक मनीषा अजय जोशी आणि अजय जोशी (रा. ब्रुक बॉन्ड कॉलनी, रिंग रोड, जळगाव) यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मूळ नशिराबाद येथील रहिवासी मोहित रमेशराव येवले (वय ३०) खासगी नोकरी करीत असून, त्यांचे ‘एम.फार्मसी’पर्यंत शिक्षण झाले आहे. मात्र, त्यांना डॉक्टर होण्याची इच्छा असल्याने त्यांना बीएएमएस अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. जळगावातील रिंग रोडवरील ‘अभिजोत करिअर फर्म’चे संचालक मनीषा जोशी व अजय जोशी यांनी फिर्यादीला नीट (NEET) परीक्षेच्या कमी स्कोअरवरही भारती विद्यापीठ पुणे किंवा इतर ठिकाणी सहज प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
धनादेशही वटले नाहीत
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहीत याने आपण भरलेले पैसे परत मागितले. दोघा पती-पत्नीने सुरुवातीला काही रक्कम परत केली आणि उर्वरित रकमेसाठी दिलेले धनादेश नशिराबाद येथील बँक खात्यात वटले नाहीत. अखेर फिर्यादीच्या तक्रारीवरून मनीषा अजय जोशी व अजय जोशी यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक संजय भंडारकर तपास करीत आहेत.
चौकट
पुणे विद्यापीठाच्या नावाने बनावट ओळखपत्र
संशयित पती-पत्नीने प्रवेशाच्या नावाखाली मोहीत येवलेकडून वेगवेगळ्या टप्प्यांत रोख व ऑनलाइन स्वरूपात एकूण ८ लाख रुपये उकळले. नंतर संशयितांनी त्या तरुणाला पुण्यच्या भारती विद्यापीठचे बनावट ओळखपत्र (आयडी कार्ड), बनावट शिक्का मारलेली सॉफ्टकॉपी आणि बनावट गुणपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवून दिले. फिर्यादीने खात्री केली असता, ही कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे उघडकीस आले.