‘सोशल’च्या जिवावर ‘भावी नगरसेवक’ची स्वप्ने | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social-Media

नाशिक : ‘सोशल’ च्या जिवावर ‘भावी नगरसेवक’ची स्वप्ने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिडको : प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचे कार्य न करता केवळ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहून लोकांचे मनोरंजन व उपदेशाचे डोस पाजणाऱ्या या काहींना आता भावी नगरसेवक पदाची स्वप्ने पडू लागल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये खुमासदार पद्धतीने चर्चिली जात आहे.

नाशिक महापालिका निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्यांना आता भावी नगरसेवक पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. याबाबत नागरिकांमध्ये मात्र चांगलीच खमंग चर्चा ऐकायला मिळत आहे.

हेही वाचा: नियोजन उणे नागरिक वाहतूक कोंडी

पूर्वी काही हौसे, नवसे, गवसे हे शहरात पोलिसांची परवानगी न घेता बॅनर लावत असे. परंतु, पोलिस आयुक्तांनी परवानगीशिवाय कुठल्या प्रकारचे बॅनर शहरात लागणार नाही. लावल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल अशा प्रकारचा आदेश व सज्जड दम दिल्याने आता बॅनरबाजी बंद झाली आहे. त्यामुळे अनेक जणांनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळविला असून, त्या माध्यमातून आपला प्रचार व प्रसार करताना काहीजण दिसत आहे. व्हॉट्स ॲप, फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या काहीजण नेहमीच सक्रिय असल्याचे बघायला मिळत आहे. या माध्यमांद्वारे एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणणे, एखाद्या घटनेवर टीका- टिप्पणी करणे, मनोरंजन करणे तसेच शहरात घडलेल्या घटनेची अपडेट माहिती सचित्र टाकणे, एखाद्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव तर एखाद्या मृत व्यक्ती बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली चे असंख्य मेसेज सोशल मीडियावर पडल्याचे यावेळी बघायला मिळतात.

आधीच पदवी बहाल

एकमेकांना भावी नगरसेवक पदाची पदवी बहाल करत, आपल्यालाही कुणीतरी भावी नगरसेवक म्हणेल अशा प्रकारची आतुरतेने वाट पाहताना काही जण दिसून येत आहे. असो जो तो आपापल्या पद्धतीने विविध मार्गाने प्रयत्न करीत असले तरी यातील एखादा जण भविष्यात भावी नगरसेवक म्हणून निवडून आल्यास कोणालाही आश्चर्य वाटायला नको.

loading image
go to top