SHC26B13449
धुळे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देताना किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी व सहकारी.
----------------
हेक्टरी ५० हजारांसह तातडीच्या उपाययोजना करा
किसान सभेचे महसूल मंत्र्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ६ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती कक्षात घेऊन बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीचे अनुदान द्यावे व नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी महाराष्ट्र किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी व सहकाऱ्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनातून केली.
धुळे जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच देण्यात आले. श्री. बावनकुळे यांच्यासह पणनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. पावसातील अनिश्चितता, पिकांचे नुकसान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केवळ पंचनामे आणि आश्वासनांपुरती कार्यवाही न ठेवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, प्रलंबित पीकविमा दावे निकाली काढावेत, पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, फळबाग व भाजीपाला उत्पादकांनाही नुकसानभरपाईच्या कक्षेत आणावे, वनजमिनीवर शेती करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाईचा लाभ मिळावा,
दुष्काळग्रस्त भागासाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करावी आणि विविध शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने केवळ कागदी कारवाईपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मदत आणि ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याची भूमिका किसान सभेने मांडली. शासनाकडून तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची भूमिका अधिक तीव्र करण्याचा इशाराही
ज्येष्ठ नेते अर्जुन कोळी, जिल्हाध्यक्ष सतीलाल पावरा, जिल्हा कार्याध्यक्ष साहेबराव पाटील, शिरपूर तालुकाध्यक्ष नारसिंग पावरा, शिरपूर शहराध्यक्ष जितेंद्र देवरे, धुळे शहराध्यक्ष पोपटराव चौधरी, ॲड. सचिन थोरात, जिल्हा सचिव वसंत पाटील, शिंदखेडा तालुकाध्यक्ष नाना पाटील, शेतमजूर युनियन जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष पाटील, ॲड. रोशन परदेशी, साक्री तालुकाध्यक्ष शंकर पाटील, धुळे तालुकाध्यक्ष बापू गर्दे यांनी निवेदनातून दिला.