दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ४८५ कोटींची गरज
दहा तालुक्यांमधील पंचनामे पूर्ण; ५ लाख ७ हजार हेक्टरचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : जिल्ह्यात दुष्काळग्रस्त १० तालुक्यांतील खरीप पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून तब्बल ५ लाख ७ हजार १६४ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. अडीच हजार गावांमधील ५ लाख १६ हजार २६० शेतकरी या आपत्तीमुळे अडचणीत आल्याने त्यांना मदतीसाठी शासनाकडून ४८५ कोटींची अपेक्षा वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात जून व जुलैमधील पावसाच्या आक्षेवर शेतकर्यांनी ६ लाख ५१ हजार २८७ हेक्टरवर (१०१.६८ टक्के) पेरण्या केल्या. आठ तालुक्यात १०० टक्क्यांहून अधिक पेरण्या होऊन मका आणि सोयाबीनचे क्षेत्र वाढले. परंतु, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने सलग दोन महिने ओढ दिल्याने संपूर्ण हंगाम धोक्यात आला. यात मालेगाव तालुक्याला सर्वाधिक झळ बसली असून, एकट्या या तालुक्यात तब्बल एक लाख हेक्टरवरील पिके करपली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मदत व पुनर्वसन विभागाने पहिल्या टप्प्यात १० तालुक्यांत ‘ट्रिगर १’ लागू केला होता, ज्याचे पंचनामे आता पूर्ण झाले आहेत. तसेच, दुसऱ्या टप्प्यात निफाड, त्र्यंबकेश्वर आणि चांदवड या ३ तालुक्यांत ‘ट्रिगर २’ लागू करण्यात आला असून तेथेही पंचनाम्याचे काम सुरू आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली आहे. सध्या शेतकऱ्यांना केवळ तात्पुरत्या सवलतींपेक्षा प्रत्यक्ष पीक नुकसानीची भरपाई, कर्जाच्या ओझ्यातून दिलासा आणि पुढील हंगामासाठी आर्थिक भांडवलाची गरज आहे.
पाच हजारात काय करायचे
यंदा दुष्काळाने खरीप हंगामातील पिके करपल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा आहे. अशा परिस्थितीत शासनाने दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली. मात्र, या पाच हजारांत किराणा भरायचा, मुलांना कपडे घ्यायचे की रब्बीची पेरणी करायची? असा प्रश्न दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
तालुकानिहाय झालेले नुकसान
तालुका.............बाधीत गावे............शेतकरी...........क्षेत्र (हेक्टर)
मालेगाव..............३१९................१००१३८.............१०७४२५.०६
सटाणा..................४५४.................७८५५२..............७४१५१.७३
नांदगाव...........२७७..................५७५२४.................५३०६८.२८
कळवण..............१५२...............३२५८६................३३५१४.५०
देवळा............१३७..................३३०५३................३२९५७.८१
सुरगाणा............२३०................३४०९२..................३३५७९.२५
पेठ..................१६२..................१६६५९...............१५१७३.२६
इगतपुरी............१३१................२५६९९...............२४९३२.८९
सिन्नर...............३४७...............७०७५७...................६४१६०.६६
येवला................२००..............६७२००..................६८२०१.२०
एकूण..........२४०९.............५१६२६०..................५०७१६४.६४
….
पीकनिहाय झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
भात - ६७९९७.६६
तूर - १६४७.६५
नागली - ४८६६.१५
ज्वारी - ५७४.३३
भुईमूग - ४४४८.११
मका - २.२९ लाख
सोयाबीन - ७५८१०.८१
बाजरी - २३२५९.७४
मूग - १६६९.५७
कापूस - २८२२१.९८
कांदा - २१७७८.४१