दुष्काळ जाहीर; ऑनलाइन यंत्रणाच ठप्प
सातबारा, ‘फार्मर आयडी’साठी शेतकऱ्यांचे हेलपाटे
सटाणा, ता. ६ : निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान, दुष्काळामुळे उत्पन्नाची आशा मावळलेली असताना आता शासनाच्या ऑनलाइन यंत्रणेतील तांत्रिक अडचणींमुळे मदतीचा मार्गही अडला आहे. बागलाणमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सातबारा उतारा आणि ‘फार्मर आयडी’साठी आवश्यक असलेली ऑनलाइन संकेतस्थळे ठप्प असल्याने शेतकऱ्यांना महा-ई-सेवा व सेतू केंद्रांचे हेलपाटे मारावे लागत आहेत. दिवसभर प्रतीक्षा करूनही ‘वेबसाईट बंद आहे, उद्या या’ असे उत्तर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सटाणा शहरातील महसूल विभाग, कृषी कार्यालय, तसेच नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, डांगसौंदाणे यांसह तालुक्यातील विविध गावांमधील महा-ई-सेवा व सेतू केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र, संकेतस्थळे सुरू होत नसल्याने केंद्रचालकांसह शेतकऱ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे.
सातबारा उतारा व ‘फार्मर आयडी’शी संबंधित ऑनलाइन प्रणालीवर मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांचा ताण, सर्व्हरची समस्या किंवा अन्य तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे केंद्रचालकांकडून सांगण्यात येत आहे. संकेतस्थळावर वारंवार ‘एरर’ येत असल्याने प्रक्रिया पूर्ण होत नाही. अनेक तास प्रतीक्षा करूनही काम होत नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी केंद्रावर येण्यास सांगितले जात आहे.
बागलाणमध्ये पावसातील प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. मका, बाजरी, कांदा तसेच फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर मदतीची प्रक्रिया वेगाने सुरू होणे अपेक्षित असताना, त्यासाठी आवश्यक डिजिटल प्रक्रियेतच अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.
ऑफलाइन पर्यायाची मागणी
ऑनलाइन प्रणाली पूर्ववत होईपर्यंत शेतकऱ्यांना केवळ डिजिटल प्रक्रियेवर अवलंबून न ठेवता तलाठी, ग्राम महसूल यंत्रणा किंवा संबंधित विभागामार्फत आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन स्वीकारण्याची तात्पुरती व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. तांत्रिक अडचणी दूर करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया सुरळीत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---
दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीची आशा दाखवायची आणि ती मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संकेतस्थळेच बंद ठेवायची, ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. तांत्रिक अडथळ्यांच्या नावाखाली हेलपाटे मारायला लावणे योग्य नाही. सरकारने तातडीने ऑनलाइन प्रणाली सुरळीत करावी.
- संजय पवार, शेतकरी