पान-४ ॲंकर
------------------
दुष्काळामुळे शेती साहित्य, बैल, गाई चोरीची धास्ती!
---------------
येवल्यात वाढले चोऱ्यांचे सत्र, पशुधनासह साधनसामग्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
-------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ८ : गवंडगाव- पढेगाव शिवारात स्प्रिंकलर, अंदरसूल येथे दुचाकींसह रोख पैसे, राजापूर येथे गाय व बैल.. या मागच्या काही दिवसातील चोरीच्या घटना आहेत. दुष्काळाच्या वाढत्या झळामुळे हाताला काम नसल्याने चोऱ्यांचे प्रकार वाढत आहेत. सर्वसामान्यांना चोरीची धास्ती निर्माण झाली आहे. शेती व गृहोपयोगी वस्तूंच्या चोऱ्यांचे प्रकार वाढल्याने ग्रामीण भाग दहशतीखाली असून सुरक्षेसाठी विविध उपाययोजना शेतकरी स्वतःच अंमलात आणत आहेत.
---------------
दुष्काळ, पाणीटंचाई आणि पिकांच्या नुकसानीने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर आता शेती साहित्य व पशुधनाच्या सुरक्षेचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. घरासमोरून दुचाकी, शेतातील विहीर व शेततळ्यातील वीजपंप, लोखंडी अवजारे, वीजपंप, पाइप, केबल तसेच गोठ्यातील बैल, शेळ्या-मेंढ्यांच्या चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे नवे संकट शेतकऱ्यांना सतावत आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने मौल्यवान शेती साहित्य व पशुधनाची सुरक्षितता हा ग्रामीण भागातील चिंतेचा विषय बनला आहे.
तालुका हा कायमच दुष्काळी परिस्थितीशी झुंजणारा भाग म्हणून ओळखला जातो. यंदाही पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांवर संकट आले. तालुक्याच्या पूर्व भागात तब्बल ४६ दिवस पावसाचा खंड पडल्याने उभी पिके करपण्याच्या स्थितीत आली. त्यातच अनेक गावांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागले. अशा स्थितीत शेतीसाठी आवश्यक वीजपंप, पाइप, विद्युत केबल, फवारणी यंत्रे, लोखंडी अवजारे आणि इतर साहित्याची चोरी झाल्यास शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. दुष्काळामुळे आधीच आर्थिक गणित कोलमडले असताना चोरीमुळे होणारे नुकसान भरून काढणे अनेक शेतकऱ्यांना कठीण जात आहे.
१६-१ चौकट
पशुधनावरही संकटाची छाया
दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम शेतीसोबत पशुधनावर होत आहे. चारा आणि पाण्याची कमतरता असल्याने बैल, शेळ्या-मेंढ्या आणि इतर जनावरांचे पालन करणे शेतकऱ्यांसाठी खर्चिक ठरत आहे. यापूर्वीही तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात चारा व पाणीटंचाईमुळे पशुधन सांभाळण्याचे संकट निर्माण झाले आहे. शेळ्या, मेंढी किंवा बैल चोरीला जाणे म्हणजे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या साधनालाच मोठा धक्का बसण्यासारखे आहे. त्यामुळे गोठे, वाडे आणि शेतातील पशुधनाच्या सुरक्षेबाबत शेतकरी अधिक सतर्क झाले आहेत.
१६-१
पोलिस गस्त वाढविण्याची मागणी
आठवड्यापूर्वी तर ग्रामीण भागात दिवसा ड्रोन फिरून चोऱ्यांसाठी सर्वे होत असल्याची अफवा पसरली होती. मात्र सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक अधिकच दहशतीत आहे. त्यामुळे पोलिसांनी ग्रामीण भागात रात्रीची पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी होत आहे. गावपातळीवर शेतकरी, ग्रामस्थ आणि पोलिस यांच्यात समन्वय, ग्रामपातळीवर सुरक्षा समित्या सक्रिय करणे आणि चोरीच्या घटनांवर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.
------------
कोट
दुष्काळामुळे खरीप पूर्ण उद्धवस्त झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. आता शेती साहित्य, पशूधन, वाहने, वस्तू चोरीला जाणे गंभीर आहे. ग्रामीण भागात गस्त वाढवावी तसेच गावोगावच्या नागरिकांनीही दक्षता घेऊन स्वतः दिवसा व रात्रीही नजर ठेवावी.
- बाबा डमाळे, भाजप नेते, सुरेगाव रस्ता.
--------------