(पान ४ ला ॲंकर)
(लोगो : चित्र दुष्काळाचे)
KPD26B13568
कापडणे : शेतातील चारा गोठ्यात साठविण्यासाठी नेतांना शेतकरी बाजीराव पाटील.
--------
मोफत मिळणाऱ्या चाऱ्याचे वाढले दर
ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव; शेतकऱ्यांचा चारा संकलनावर भर
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ३० : धुळे जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. पावसाअभावी मका, ज्वारी, बाजरी पिके दोन ते अडीच फुटांवरच वाळून गेली असून, शेतकरी हेच पीक आता चारा म्हणून गोळा करू लागले आहेत. ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव मिळत आहे.
धुळे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून चांगला पाऊस होत होता. त्यामुळे मुबलक चारा उपलब्ध होता. शेतात पडलेला मक्याचा चारा मोफत न्यायला देखील कोणी तयार नव्हते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना चारा शेतातच जाळून टाकावा लागत होता. मात्र, यंदा चित्र पूर्णपणे पालटले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे हिरवा चारा संपुष्टात आला असून, तोच टाकाऊ समजला जाणारा वाळलेला चारा आता बैलगाडीभर एक ते दोन हजार रुपये दराने विकला जात आहे.
शेतकरी सध्या शेतातील प्रत्येक काडी न् काडी वेचून साठवणूक करत आहेत. जनावरांसमोर चारा टंचाईचे संकट उभे राहू नये. यासाठी दिवस- रात्र कष्ट घेऊन कडबा, वैरण गोळा करण्याचे काम सुरू आहे. दुभत्या जनावरांसह बैलांच्या जगवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, प्रशासनाला चाराटंचाईवर उपाययोजना म्हणून आगामी दोन महिन्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पशुसंवर्धन विभागाने चारा बियाणे वाटप, पाणीटंचाई असलेल्या गावांत टँकरने पाणीपुरवठा करून चारा उत्पादनास प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-----
दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा
धुळे जिल्ह्यात दुभत्या गायी म्हशींचे प्रमाण अधिक आहे. दापुऱ्यासारखी काही गावे दुधग्राम म्हणून ओळखली जातात. इतर गावांमध्येही दुभत्या जनावरांची संख्या लक्षणीय आहे. येत्या दोन- तीन महिन्यात हिरवा चारा कसा उपलब्ध करावा, ही चिंता शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे.