रविवार विशेष
-----------
शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण
-------------------------------
खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्यानंतर रब्बी हंगामावरही पाणीटंचाईचे संकट आहे. संकटकाळात सरकारने दुष्काळग्रस्तांना दिलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत तुटपुंजी असली तरी त्यातून शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांत नव्याने आशेचा किरण निर्माण होईल.
- गौरव जोशी
एलनिनोच्या प्रभावामुळे यंदा जिल्ह्यात पावसाने खंड दिला. पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. परिणामी जिल्ह्यात पंधरापैकी तब्बल १३ तालुक्यात राज्य सरकारने दुष्काळ घोषित करताना विविध प्रकारच्या उपाययोजना लागू केल्या. तसेच शेतकऱ्यांचा दिवाळी सण गोड करण्यासाठी पाच हजार रुपयांची तातडीची अग्रिम मदतही दिली आहे. पण सध्याचे संकट बघता शेतकऱ्यांना अधिक दिलासा देण्याची गरज आहे. जिल्ह्यात अपुऱ्या पावसाचा ३ हजार ३०६ गावांना फटका बसला आहे. तब्बल ६ लाख ४४ हजार २८९ हेक्टरवरील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा, भात तसेच इतर भाजीपाला आणि फळपिकांचे नुकसान झाले. परिणामी ५ लाख ५७ हजार ७०१ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी ६५८ कोटी ६० लाख ३६ हजारांच्या अनुदानाची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव जिल्हास्तरावरुन राज्यस्तरावर सादरही करण्यात आला आहे. अर्थात ही मदत मिळण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. या दरम्यान, सरकारने ५ हजारांची तातडीची अग्रिम मदत देऊ करून बाधित शेतकऱ्यांचा दिवाळीचा सण गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, ही मदत तात्पुरती असून बळीराजाचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी व कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने शेतीपिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच अवकाळी पाऊस, गारपिट तसेच चक्रीवादळाच्या माऱ्यामुळे शेतीपिके मातीमोल होत आहेत. परिणामी पोटच्या पोराप्रमाणे जपलेली शेती एका क्षणार्धात उद्ध्वस्त होताना पाहून बळीराजाचे हृदय पिळवटून निघते. परंतु, या घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणेच शासन-प्रशासन कागदी घोेडे नाचविण्यात मग्न असते. या दरम्यान, पीक पंचनामे, कागदपत्रांचे सोपस्कार तसेच राज्यस्तरावरून मदतीची घोषणा या सर्व प्रक्रियेत महिनो न् महिने व्यतित होतात. एवढे करुनही शेतकऱ्यांच्या हाती तुटपुंज्या मदतीचा धनादेश पडतो. शासनाची ही मदत म्हणजे शेतकऱ्यांसाठी एकप्रकारे चेष्टाच म्हणावी लागेल. परंतु, एवढ्यावरच शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा थांबत नाहीत. बँकांचे कर्ज तसेच वसूलीसाठी तगाद्याच्या ओझ्याखाली बळीराजा दिवसेंदिवस दबून जात आहे. हा दबाव सहन न झाल्याने सरतेशेवटी तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. तेथेही अशा बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या पदरी निराशाच येते. त्यामुळेच खऱ्याअर्थाने हे चित्र बदलण्याची खरी गरज आहे. त्यासाठी शासन-प्रशासन तसेच समाजाने पुढे येत बळीराजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. तसेच एवढ्यावर न थांबता शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेेत. त्यासाठी शेतात नवनवीन प्रयोग राबवितानाच शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला पाहिजे. तरच खऱ्याअर्थाने शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाचे जीवन प्रकाशमान होईल.