(पान ४ ला मेन)
MSI26B09725
म्हसदी : शिवारात लागवड केलेली झेंडू फुलांची शेती.
----------------
पावसाअभावी झेंडूची फुले कोमेजली
धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका
दगाजी देवरे : सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. २१ : नवरात्रोत्सव म्हणजे नवचैतन्य.नवरात ते दीपोत्सव काळात सर्वच फुलांना मागणी असते. यंदा दुष्काळाचा फटका फुल शेतीला देखील बसल्याचे चित्र आहे. यंदा अपेक्षेने बऱ्यापैकी लागवड झाली असली तरी पावसाअभावी फुलशेती फारशी बहरू शकलेली नाही.
-------
घटस्थापनेपासून सर्वच फुलांना मागणी वाढते. दरही बऱ्यापैकी मिळतो. धुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पारंपरिक शेती बरोबरच जोडधंदा म्हणून फुल शेती केली जाते. साधारणत: नवरात्रोत्सवानंतर दीपावली, तर थेट लग्न सराईत सर्वच फुलांना मागणी असते. स्थानिक मागणीनुसार फुलांची विक्री केली जात असली तरी काही शेतकरी इतर ठिकाणी फुले विकण्याचे नियोजन करतात. धुळे जिल्ह्यात प्रामुख्याने नेर, कापडणे, म्हसदी, ककाणी, रानमळा, निमगूळ, न्याहोळद, चिकसे, जैताणे, नवडणे, पिंपळनेर, सामोडे, दिघावे आदी ठिकाणी फुलशेती केली जाते. लहरी निसर्गाचा फटका शेती व्यवसायाला बसला असून, त्याला फुलशेतीही अपवाद ठरली नाही. प्रामुख्याने काही फुले वर्षभर येतात. तर काही ठराविक वेळेत लावली जातात. फुलशेती फारशी खर्चिक नसली तरी दर चांगला मिळाला तर परवडत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. काही शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरत पाॅली हाऊसमध्ये शोभेच्या फुलांची लागवड केली आहे.
झेंडूला सर्वाधिक मागणी
नवरात्रोत्सवात सर्वाधिक मागणी झेंडूला असते. नऊ दिवस कुळदेवीचे भाविक देवीला आहेर, ओटीबरोबर फुलहार हमखास चढवतात. धुळे शहरातील एकवीरा, आदिमाया धनदाईदेवी (म्हसदी), भटाईदेवी (भदाणे), म्हाळसादेवी (चिचंखेडा), पेडकाईदेवी (शिंदखेडा), नागाई (कोकले) धनाई- पुनाई, इंदाई माता (इंदवे), म्हसाईमाता (निजामपूर), चिराईदेवी (चिराई) आदींसह अन्य देवींच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी असते. फुलांची विक्री ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात असते. शेतकरी शेतातील फुले तोडून शहरात विक्रीसाठी नेतात. नवरात्रोत्सव व दीप पर्वात जास्त मागणी झेंडूच्या फुलांना असते.
शोभेची फुलेही खातात भाव
नवरात्रोत्सवात झेंडू, शेवंती निशिगंध, गॅलेंडरसारख्या फुलांना मागणी अधिक असते. अन्य शोभेच्या फुलांना वर्षभर मागणी असते. झेंडूची फुले चाळीस ते पन्नास रुपये किलो, लाल झेंडू पन्नास ते साठ, निशिगंधा तीनशे ते चारशे, शेवंती दोनशे रुपये प्रतिकिलो, तर गुलाब पाच ते दहा रुपये नगाप्रमाणे विकला जात आहे. दिवाळीपर्यंत फुलांना मागणी असणार आहे. दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तथापि, दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे सणा- सुदीच्या काळात वेळेत फुले मिळणे कठीण होणार असल्याची माहिती फुल उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. यंदा अल्प पावसामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला असून, शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणारा दुग्ध व्यवसाय पाणी, चारा टंचाईमुळे अडचणी येणार आहे. तिच अवस्था फुलशेतीची झाली आहे.
-----------
अनेक वर्षांपासून पुजेचे साहित्य विक्रीबरोबरच फुलशेती केली जात आहे. ग्रामीण भागात फुलांना ठराविक वेळेत मागणी असते. नवरात्रोत्सवात फुलांची मागणी वाढली तर दर वाढतील.
- प्रशांत हिम्मतराव देवरे, कुलस्वामिनी फुल भांडार, म्हसदी