लोगो : सोमवारची मुलाखत
फोटो :
यंदा दहा वर्षातील सर्वात कमी रब्बीची पेरणी
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी सुचविल्या उपाययोजना
लीड
दुष्काळामुळे यंदा खरीप हंगामावर विपरीत परिणाम झालेला असताना रब्बीच्या पेरणीतही ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षात इतकी कमी पेरणी झालेली नाही. उन्हाळ्यात गुरांना चारा व शेतीला पाणी मिळेल की नाही, याची चिंता भेडसावत असताना याविषयी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्याशी साधलेला संवाद...
- किरण कवडे
…
प्रश्न : जिल्ह्यात दुष्काळाची सद्यःस्थिती काय आहे?
रवींद्र माने : पावसाळ्यात काही तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे प्रमुख धरणे भरली आहेत. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नसला तरी शेतीला हे पाणी देता येणार नाही. पिण्यासाठी आरक्षित ठेवावे लागेल. त्याचा शेतीवर परिणाम होवू शकतो. १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यामुळे येथील खरीप व रब्बी पिकांवर याचा थेट परिणाम झाला आहे. विशेषतः मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, बागलाण व सिन्नर या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसलेला दिसतो.
…
दुष्काळाचा रब्बी हंगामावर काय परिणाम होईल?
: जिल्ह्यात रब्बीचे १.११ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात गहू, ज्वारी, उन्हाळी मका आदींचा समावेश आहे. उन्हाळ कांद्याची २.२५ लाख हेक्टरवर लागवड होते. या दोन्हींचे क्षेत्र दीड लाखापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांचा इतिहास बघता रब्बी हंगामात यापूर्वी एवढी घट झालेली नाही. यावरून दुष्काळाची तीव्रता आपल्या लक्षात येवू शकते.
…
चारा व पाण्याचे व्यवस्थापन कसे राहिल?
: गुरांना चारा देण्याचे संपूर्ण नियोजन पशुसंवर्धन विभागामार्फत केले जात आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप सुरु केले असून जानेवारीत हा चारा गुरांना मिळेल, अशा स्वरूपाचे त्यांचे नियोजन आहे. यात कृषी विभागाने ज्वारीचे बियाणे वाटण्याचा निर्णय घेतला आहे. १०३ क्विंटल बियाणे (मिनी किट) आपण मोफत देत आहोत. यातून ज्वारीचे क्षेत्र १० हजार हेक्टरवरून सुमारे ३० हजार हेक्टरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. ज्वारी व मक्याचा चारा गुरांना उपलब्ध होईल.
…
उन्हाळ कांदे, द्राक्ष, उसाला पाणी मिळेल का?
: जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा साठा असला तरी पिण्यासाठी हे पाणी आरक्षित केले जाईल. त्यामुळे शेतीला दरवर्षी मिळणारे आवर्तन यंदा मिळण्याची शक्यता कमी दिसते. त्याचा थेट परिणाम रब्बी हंगामावर होईल. जिल्ह्याच्या पूर्व भागाची स्थिती अधिक खालावलेली दिसते. या ठिकाणच्या उपाययोजनांवर अधिक भर द्यावा लागेल. कांद्याची २.२५ लाख हेक्टरवर लागवड होते. यंदा दीड लाखापर्यंत लागवड होईल. तर उसाचे क्षेत्र कमी असले तरी त्यालाही पाणी टंचाई भेडसावेल. द्राक्ष क्षेत्रावर फारसा परिणाम संभवत नाही.
…
दुष्काळच्या एकूण उपाययोजना काय असतील?
: शासनाने दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (एमआरईजीएस) अंतर्गत उपाय योजना करण्याचे नियोजन दिले आहे. पीकनिहाय अंदाजपत्रक (इस्टीमेट) तयार करण्यात येणार असून त्याचे दर शासनाने निश्चित करून दिले आहे. या माध्यमातून दुष्काळाच्या उपाययोजना केल्या जातील.