टुडे पान ३, ॲंकर
(भाजीपाल्याचे संग्रहित छायाचित्र वापरावे)
---
दुष्काळाच्या झळांनी भाजीपालाही कडाडला
आवक घटल्याने भावावर परिणाम; गृहिणींचे महिन्याचे ‘बजेट’ कोलमडले
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा परिणाम शेती उत्पादनावर झाल्याने शहरातील भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. स्थानिक भागातून होणारी भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने बाजारपेठेत भाज्यांची उपलब्धता घटली आहे. त्यातच वाहतूक खर्च आणि घाऊक बाजारातील वाढलेल्या दरांमुळे किरकोळ बाजारातही भाजीपाला महागला आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांच्या घरखर्चाचे गणित बिघडले असून, पूर्वी किलोभर भाजी घेणारे ग्राहक आता अर्धा किलो किंवा पाव किलो भाजी खरेदी करताना दिसत आहेत.
शहरातील प्रमुख भाजीबाजारांसह विविध भागांतील भाजीविक्रेत्यांकडे दरवाढीचा परिणाम जाणवत आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, भेंडी, वांगी, गवार, फ्लॉवर, कोबी यांसारख्या भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. रोजच्या जेवणात आवश्यक असणाऱ्या भाज्याही महागल्याने गृहिणींना उपलब्ध बजेटमध्ये स्वयंपाकाचे नियोजन करावे लागत आहे. यंदा पावसाने अनेक भागांत अपेक्षित साथ न दिल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पिके टिकविण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी लागली. काही ठिकाणी पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी उत्पादनात घट झाली. त्यामुळे बाजारात येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण कमी झाले आहे. स्थानिक आवक घटल्याने बाहेरील बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत असून, त्याचा परिणाम दरांवर होत आहे. भाजीपाला खरेदी करताना ग्राहकांकडून आता दरांची तुलना केली जात आहे. कुटुंबासाठी आवश्यक तेवढाच भाजीपाला घेण्यावर भर दिला जात आहे.
आवक कमी
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये १५ नोव्हेंबरपर्यंतच्या नोंदींमध्ये काही बाजारांतील भाजीपाल्याची आवक कमी झाल्याचे दिसते. जळगाव बाजार समितीत टोमॅटोचा सर्वसाधारण घाऊक दर १४ नोव्हेंबरला प्रतिक्विंटल १२०० रुपये नोंदविण्यात आला होता. मात्र, घाऊक बाजारातील दर आणि किरकोळ विक्रीचे दर वेगवेगळे असतात.
...असे आहेत भाव
कांदे ७० किलो
बटाटे ३० ते ४० किलो
लसून ६० ते ७० पाव
गाजर, ४० ते ५० किलो
मिरची ३० ते ४० पाव
अद्रक ६० ते ७० पाव
कोट
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतातून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण काही प्रमाणात घटले आहे. पूर्वीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने घाऊक बाजारातून भाजीपाला महाग दराने खरेदी करावा लागत आहे. वाहतूक खर्चही वाढला आहे. त्यामुळे नाइलाजाने ग्राहकांना वाढीव दराने भाजीपाला विकावा लागत आहे. ग्राहकही आता किलोऐवजी अर्धा किंवा पाव किलो भाजी घेत आहेत.
- गोविंदा वाघ, भाजीपाला विक्रेता