चित्र दुष्काळाचे/पेठ
टंचाई निवारणासह रोजगारनिर्मितीचा कृती आराखडा हवा
-----------------------------------------------
खरीप नुकसानीची भरपाई, चारा-पाण्याची व्यवस्था आणि स्थानिक स्तरावर रोजगार मिळावा
रखमाजी सुपारे, सकाळ वृत्तसेवा
पेठ, ता. ४ : तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, केवळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करून तात्पुरते उपाय करण्याऐवजी कायमस्वरूपी नियोजनाची गरज आहे. गावनिहाय पाणी आराखडा, जलसंधारणाच्या कामांना गती, खरीप नुकसानीची भरपाई, पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था आणि रोजगार हमीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती अशा बहुआयामी उपाययोजनांवर भर दिल्यास आदिवासी भागातील स्थलांतर रोखण्यासह दुष्काळाच्या संकटाची तीव्रता कमी करणे शक्य होणार आहे.
सध्या भात पीक पोटरी ते ओंबी बाहेर पडण्याच्या (फुलोरा) नाजूक टप्प्यावर असून नागली, वरई, तूर, भुईमूग, उडीद आणि खुरसनी यांसारखी पिके फुलोरा व शेंगा लागण्याच्या स्थितीत आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिके करपू लागली आहेत. परतीच्या पावसावर खरीप व रब्बीचा हंगाम अवलंबून आहे. मॉन्सूनने पुरेशी साथ न दिल्याने विहिरी, कूपनलिका आणि स्थानिक जलस्रोतांची पातळी खाली जात आहे .
पंचनामे तत्काळ करावेत
तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेतील पाणीपुरवठा योजनांच्या कामांमध्ये वेगवेगळ्या त्रुटी असल्याने ऐन उन्हाळ्यात जवळपास ५० ते ६० वाड्यापाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने शेतमजुरांना कामे उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. पीक नुकसानीचे पंचनामे वेळेत करण्याची मागणी होत आहे.
कालावधी सरासरी -
जून ते सप्टेंबर अपेक्षित पाऊस- १७१० मिमी
प्रत्यक्षात झालेला पाऊस - १२६०.७ मि.मी.
टक्केवारी ७३.७%
---------------
२१ सप्टेंबरपर्यंतचा पाऊस- ३३३.० मि.मी.
झालेला पाऊस- ९०.५ मि.मी.
टक्केवारी - २७.२%
शेतीपूरक दुग्ध व्यवसायावर परिणाम
निसर्गावर अवलंबून असणारी भात शेती बेभरवशाची झाली असून आदिवासी बळीराजा उपजीविकेसाठी नगदी चलन म्हणून दोन-पाच गाई म्हशी पदरी ठेवतो, मात्र यंदा पावसाने फिरवल्याने जनावरांसाठीचा चारा प्रश्न निर्माण होण्याची स्थिती आहे . त्यामुळे प्रशासनाने जनावरांसाठी चारा छावण्या द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कमी पावसाचा परिणामामुळे कृषी सेवा केंद्रे, खत बियाणे विक्री, शेतमजुरी, वाहतूक, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण बाजारपेठेतील उलाढालीवर झाला असून शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने अर्थचक्र मंदावण्याची भीती निर्माण झाली आहे.
रोजगाराचा प्रश्न गंभीर
आदिवासी भागातील मजुरांचे कामाच्या शोधात कल्याण, नाशिक, निफाड, दिंडोरी, कळवण, पिंपळगाव, सिन्नर तर गुजरात मधील: कापडरा, वलसाड, वापी, वासदा, उन्हई, ह्या शहरांकडे स्थलांतर होते. हे स्थलांतर तातडीने रोखण्यासाठी मनरेगा अंतर्गत नवीन कामांना तत्काळ मंजुरी देऊन मजुरांच्या हाताला काम देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
पशुधनाची संख्या
गायी - ७२३५०
म्हशी - ३७२६
शेळ्या -४३२२१
एकूण ११९२९७
इन्फो...
या आहेत पेठवासियांच्या अपेक्षा...
- पेठ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन गावनिहाय कृती आराखडा तयार करावा.
- पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्या-पाड्यांना टँकरद्वारे नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करावा.
- बंद असलेल्या नळपाणी योजना, विहिरी आणि हातपंपांची तातडीने दुरुस्ती करावी.
- उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे तसेच गरजेनुसार कालव्याने पाणी सोडावे.
- खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
- पीकविमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्वरित मिळवून द्यावी.
- दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे पीककर्ज पुनर्गठित करावे; कर्जवसुलीला स्थगिती द्यावी.
- पशुधनासाठी पिण्याचे पाणी, लसीकरण आणि फिरत्या पशुवैद्यकीय उपचारांची व्यवस्था करावी.
- रोजगार हमी योजनेतून गावागावांत वाड्या - पाड्यावर तातडीने कामे सुरू करून मजुरांच्या हाताला रोजगार द्यावा.
- रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांना गावातच काम उपलब्ध करून द्यावे.
- आदिवासी भागातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पाणी व पोषण आहाराचा नियमित पुरवठा करावा.
- जलसंधारणाची कामे, नाला खोलीकरण, गाळ काढणे आणि पाझर तलावांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी.
- तालुक्यात दुष्काळ नियंत्रण कक्ष सुरू करून नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे.
- जनावरांसाठी चारा छावण्या, चारा डेपो आणि पशुखाद्यावर अनुदान देण्याची तयारी ठेवावी.
- संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी विहीर अधिग्रहण, टँकर भरण्याचे स्रोत आणि टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन आधीच करावे.
- आदिवासी भागातील वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी शेततळी, नाला बंडिंग आणि बांधबंदिस्तीची कामे हाती घेणे.
- गाव तिथे रस्ता या न्यायाने वाड्या -पाड्यांना जोडणाऱ्या कच्च्या रस्त्यांची दुरुस्ती करावी.
कोट...
पावसाने हुलकावणी दिल्याने भात, नागली, वरई ही पिके करपू लागली आहेत. हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे.
- योगिता गावीत, शेतकरी, देवीचा माळ (PTH26B01924)
कोट...
अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतीवरील खर्चही निघत नाही. बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न ''आ'' वासून उभा आहे. शासनाने पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी .
- गिरिधर वाघेरे, शेतकरी, कोहोर (PTH26B01921)
फोटो - कोहोर येथील भात पिकाचे झालेले नुकसान.(PTH26B01923)