दुष्काळ निवारणात हलगर्जीपणा
केल्यास शिस्तभंगाची कारवाई
----
प्रशासनाने लावली यंत्रणा कामाला, दर शुक्रवारी द्यावा लागणार अहवाल
-----
सकाळ वृत्तसेवा ः
धाराशिव, ता. २२ ः जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंत्रणा पूर्णपणे कामाला लावली असून, आता दुष्काळ निवारणाच्या कामात कसूर किंवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचा सज्जड दम जिल्हाधिकाऱ्यांनी भरला आहे. जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी बुधवारी (ता. २१) काढलेल्या आदेशात प्रशासकीय उत्तरदायित्वावर भर देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांत दुष्काळाचा सामना करण्यासाठी आधीच तालुकास्तरीय व गावपातळीवर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, केवळ नियुक्ती करून न थांबता आता या यंत्रणेच्या कामावर कठोर देखरेख ठेवण्यात येणार आहे. सर्व तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीला उपस्थित राहून प्रगती अहवाल देणे व प्रत्येक शुक्रवारी नियमितपणे दुष्काळी परिस्थितीचा अहवाल निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकऱ्यांना दिलासा देणे, जनावरांचे संगोपन करणे आणि पिण्याच्या पाण्याची व रोजगाराची शाश्वत सोय करणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला असून, वेळेत काम न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
----
असे आहे प्रशासकीय नियोजन
- प्रत्येक गावात पाहणी : नियुक्त केलेले गाव नोडल अधिकारी प्रत्यक्ष गावात जाऊन नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
- २४ तास नियंत्रण कक्ष : प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयांतर्गत २४ तास कार्यरत राहणारा विशेष दुष्काळ नियंत्रण कक्ष स्थापन केला गेला आहे.
- पाणी व चाऱ्याचे नियोजन : पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई, जनावरांसाठी चारा छावण्या आणि चारा डेपोचे वस्तुनिष्ठ नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- तातडीने पंचनामे व मदत : बाधित शेतपिकांचे पंचनामे वेळेत पूर्ण करून शासनाचे अनुदान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.