SKD26B04328
धुळे : महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करताना शिवसेना ठाकरे पक्षाचे शानाभाऊ सोनवणे व पदाधिकारी.
-------
दुष्काळग्रस्तांना दोन लाखांपर्यंत मदत द्या
शिवसेनेचे (उबाठा) महसूलमंत्री बावनकुळे यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. ५ : धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शिवसेना धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधले. याबाबत त्यांनी बावनकुळे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे पंचनाम्यांच्या प्रक्रियेत विलंब न करता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट किमान एक लाख ते कमाल दोन लाख रुपयांपर्यंत विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली. धुळे जिल्ह्याला प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, तसेच धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्याचा पोखरा योजनेत समावेश करून कृषी, जलसंधारण व सिंचनासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
दुष्काळामुळे शेतीतील रोजगार कमी झाल्याने रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत. शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा देऊन भीतीचे वातावरण निर्माण करू नये, तसेच खासगी शाळांनी दुष्काळी परिस्थितीत पालकांकडे शुल्कवसुलीसाठी अनावश्यक तगादा लावू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची मागणीही करण्यात आली.
या वेळी उपजिल्हाप्रमुख छोटू पाटील, उपजिल्हा समन्वयक मनोज पवार, आधार बोरसे, राजेंद्र पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.