-------------------
दुष्काळग्रस्तांना उद्या दिवाळीच्या शिधा किटचे वाटप
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून ‘रोहयो’ मजुरांना भेट
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३ : रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या सुमारे २५ हजार नोंदणीकृत कष्टकरी मजुरांना दिवाळीनिमित्त शिधा किट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. या किटचे वितरण गुरुवारी (ता. ५) सकाळी १० वाजता सेंट मदर टेरेसा स्कूलमध्ये होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत दिलीपराव मोरे यांनी दिली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील पाणीटंचाई, रोजगाराची परिस्थिती, ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी तसेच रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. दिवाळीच्या सणात या कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने पालकमंत्री मुश्रीफ यांनी शिधा किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या शिधा किटमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, बेसन पीठ, साखर, खाद्यतेल व पोहे अशा पाच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम रोजगार सेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ लेव्हल एजंट यांच्या संयुक्त सहकार्याने शिधा किट वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. ता.५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सेंट मदर टेरेसा स्कूल, नंदुरबार येथे आयोजित कार्यक्रमातून संबंधित ग्राम रोजगार सेवक व कार्यकर्त्यांना शिधा किट वितरणाबाबत आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतर आपापल्या कार्यक्षेत्रातील पात्र व नोंदणीकृत रोजगार हमी योजनेवरील मजुरांपर्यंत ही मदत पोहोचविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका पदाधिकारी, शहराध्यक्ष, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, बूथ कार्यकर्ते, बीएलए तसेच जिल्ह्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केले आहे.