माळमाथ्यावरील दुष्काळग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा
----------------------------------------
दिवाळीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत नाहीच
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता. ७ : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली असली, तरी माळमाथा भागातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. दिवाळीसारखा मोठा सण आला, तरी शासनाकडून जाहीर झालेली मदत खात्यात जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा केली जात आहे. १ नोव्हेंबर २०२५ पासून आजपर्यंत विविध शासकीय योजनांसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा ई-केवायसी करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.
वनपट्टाधारक शेतकऱ्यांना अद्याप ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांक मिळालेला नसल्यास केवळ ई-केवायसीच्या आधारे मदत वितरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, फॉर्मर आयडी उपलब्ध असतानाही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे मदत वितरणाच्या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे चौकशी करीत आहेत. मात्र, त्यांनाही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.