फोटो : NSK26H31462
धडगाव : तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सहभागी शेतकरी. (छायाचित्र : सागर निकवाडे)
------------
दुष्काळी मदतीसाठी आदिवासी शेतकऱ्यांचा एल्गार
विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ५ : दुष्काळी मदत मिळण्यासाठी धडगाव येथे अखिल भारतीय सरपंच परिषद आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे धडगाव येथे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. प्रलंबित फार्मर आयडी, वनहक्क दावे, दुष्काळी मदत आणि घरकुलसाठी वाळू मिळावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. येत्या १५ दिवसांत मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
यापूर्वी ३० जुलैला याच मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धडगाव तहसीलदारांना निवेदन पाठवण्यात आले. प्रलंबित फार्मर आयडी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, वनहक्क दावे निकाली काढावेत, पट्ट्यांमध्ये दुरुस्ती करावी, नवीन वनहक्क दाव्यांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे, वनपट्टा न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही दुष्काळी नुकसान भरपाई द्यावी, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत. घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी, वनजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर सरकारी फॉरेस्टची नोंद रद्द करून मूळ शेतकऱ्यांचे नाव लावावे, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहे. मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
------
धडगाव तालुक्यातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही हा लढा उभा केला आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. फार्मर आयडी आणि वनहक्क पट्ट्यांअभावी शेतकरी शासकीय योजना व दुष्काळी मदतीपासून वंचित आहेत.
- ॲड. वसंत वळवी, अध्यक्ष, अक्राणी तालुका सरपंच परिषद