NSK26H33730
जळगाव : दुष्काळ निवारण आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी रोहन घुगे. शेजारी सीइओ करिष्मा नायर, उपवन संरक्षक सौरिश सहाय, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आदी.
----
दुष्काळाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा
पालकमंत्री गुलाबराव पाटील : दुष्काळ निवारण आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने युद्धपातळीवर काम करावे. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात बुधवारी (ता. २८) दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या दुष्काळ निवारण आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील किमान १०० कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवर आवश्यक फळ्या बसविणे, त्यांची देखभाल व दुरुस्ती करणे, नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि आवश्यक नीडल बसविण्याची कामे तातडीने हाती घ्यावीत. गाव तलाव व पाझर तलावांतील गाळ काढणे, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण आणि कृषी बंधाऱ्यांसाठी उपयुक्त स्थळे निश्चित करून तालुकानिहाय प्रस्ताव सादर करावेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान चार ते पाच वनराई बंधारे उभारण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यात सात हजारांहून अधिक वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवावे. एक लाख जलतारा निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून नियोजन करावे. शहरी व ग्रामीण भागातील शासकीय इमारतींवर पावसाचे पाणी साठविणे आणि जमिनीत मुरविण्यासाठी रेनवॉटर हर्वेस्टिंगसारख्या आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेताना, दुष्काळी परिस्थितीत कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. भुसावळ व पारोळ्यासह जिल्ह्यातील इतर नागरी क्षेत्रांतही पाणीपुरवठ्याच्या दोन फेऱ्यांमधील अंतर कमी करून नागरिकांना पुढील काळात पाणी उपलब्ध होईल, यासाठी आवश्यक नियोजन करावे. अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असलेल्या नगरपरिषदांनी पाणी आरक्षण वाढविण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपवन संरक्षक सौरिश सहाय, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजूषा घाटगे, जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगिड्डे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, उपस्थितीत होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे, सर्व उपविभाग अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
चारानिर्मिती वाढवा
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायतींच्या गायरान जमिनींवर चारा उत्पादनाचे नियोजन करावे, शेतकऱ्यांना मका व ज्वारीच्या बियाण्यांचे योग्य पद्धतीने वाटप करावे आणि वनक्षेत्रातही चारानिर्मितीच्या शक्यता तपासाव्यात. वनक्षेत्रातील हिंस्त्र वन्यप्राण्यांपासून नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करून निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावेत आदी सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.